सिडको, नाशिकरोड येथून २९ हजारांचा नायलॉन मांजा जप्त

नाशिक | प्रतिनिधी

सिडकोत दोन ठिकाणी व नाशिकरोड येथे एका नायलॉन मांजाच्या विक्रेत्यावर धाडी घालून गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांवर कारवाई केली आहे. या कारवाईत २९ हजार रुपये किमतीचा मांजा जप्त केला आहे.

नायलॉन मांजामुळे पशू-पक्ष्यांसह मानवी जीवन धोक्यात येते. म्हणून नायलॉन मांजाच्या वापरास मनाई करणारा आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. तरीही काही ठिकाणी संक्रांतीच्या पार्श्‍वभूमीवर नायलॉन मांजाची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे.

नाशिक शहर गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार सिडकोतील राणाप्रताप चौकातील हनुमान मंदिर परिसरात नायलॉन मांजाच्या विक्रेत्यावर धाड घातली आणि नऊ हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजासह १७ गट्टू व दोन फिरक्या असा मुद्देमाल ताब्यात घेतला. या प्रकरणी निशांत किशोर सोनकर (रा. राणाप्रताप चौक) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

तसेच उत्तमनगर येथे शिवपुरी चौक, सेंट लॉरेन्स शाळेजवळ अरिहंत किराणा स्टोअरमध्ये नायलॉन मांजाची विक्री होत आहे, अशी खबर मिळाल्यामुळे मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने येथे धाड टाकून ११ हजार ३०० रुपये किमतीचे मांजासह १७ गट्टू जप्त केले. यावेळी सचिन लखीचंद समदडिया (रा. औदुंबर स्टॉप, राणाप्रताप चौकाजवळ) या दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोडला कारवाई
सिडकोप्रमाणेच नाशिकरोड परिसरातही जेलरोडवरील संत ज्ञानेश्‍वरनगर येथे बाळासाहेब खंडेराव राहिंज हा इसम नायलॉन मांजाची विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाचे हवालदार प्रकाश भालेराव यांना मिळाली होती. त्यानुसार युनिट-2 च्या पथकाने कारवाई करून राहिंज याच्याकडून 20 गट्टूंसह 10 हजार रुपये किमतीचा नायलॉनचा मांजा जप्त केला.