नाशिक । प्रतिनिधी
राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत लसीकरणात नाशिक जिल्हा मागे पडल्याने जिल्ह्यात निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. ९० टक्के लोकांचा कोरोना प्रतिबंधक पहिला डोस आणि ७० टक्के लोकांनी दुसरा डोस घेतलेल्या १४ जिल्ह्यांमधील कोरोनामुळे लावण्यात आलेले निर्बंध हटवण्यात आले आहेत.
नाशिक जिल्ह्यात पहिला डोस ८६ टक्के आणि दुसरा डोस ६० टक्केच लोकांनी घेतला आहे. सरासरीने जिल्ह्यात पहिला डोस ३.७८ टक्के तर दुसरा डोस ०७. ६५ टक्क्याने कमी आहे. त्यामुळे शासन नियम पूर्ण होत नसल्याने जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.
सद्यस्थितीत नाशिक मध्ये ३०३ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्याचा पोलिटी रेट ०.५६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, मात्र राज्य सरकारने निर्बंध शिथिलता देतांना लसीकरणाबाबत ठरवून दिलेल्या निकषात नाशिक जिल्ह्याचा समावेश होत नसल्याने ‘निर्बंध जैसे थे’च ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
तर याबाबत जिल्हाधिकारी सुरज मांढरे म्हणाले कि, नागरिकांच्या विशेष मदतीमुळे आपण कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झालो. आता हळुवारपणे निर्बंध हटविले जात आहे, पण लसीकरणाची अट ठेवली असून ९० टक्क्यांची अट पूर्ण होण्यास अवघे ३.८ टक्के लोकांचे लसीकरण होणे बाकी आहे, नागरिकांनी पुढे लस घ्यावी जेणेकरून जिल्हा करुणा निर्बंध मुक्त होईल.
सध्या नाशिकमध्ये विवाह सोहळ्यासाठी फक्त ५० टक्के उपस्थिती, सामाजिक धार्मिक कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थिती, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, रेस्टॉरंट मध्ये ५० टक्के उपस्थिती, राजकीय कार्यक्रमांनाही ५० टक्के उपस्थितीची मर्यादा ठेवण्यात आली आहे.