अफगाण धर्मगुरू हत्या प्रकरणातील चौघे संशयित पोलिसांच्या ताब्यात

नाशिक: अफगाणी (Afghan citizen) नागरिक धर्मगुरू जरीफ अहमद सय्यद चिश्ती उर्फ सुफी बाबा यांची येवला तालुक्यात (Yeola) डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात (Nashik District) खळबळ निर्माण झाली होती. दरम्यान ग्रामीण पोलिसांनी या घटनेतील चौघा संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. नाशिक ग्रामीण पोलिसांनी या घटनेतील चौघा संशयितांना बदलापूरमधून (Badalapur) बेड्या ठोकल्या असल्याची माहिती पोलिसांतर्फे देण्यात आली आहे.

जरीफ चिस्ती हे निर्वासित म्हणून भारतात वास्तव्य करत होते. दरम्यान युट्यूब चैनल (YouTube) जरीफ बाबांच्या कमाईचे मोठे साधन होते. युट्युबवर जरीफ बाबांचा मोठा चाहता वर्ग होता. त्यामुळे युट्युबकडून त्यांना रक्कम आणि काही देणगी दिली जायची. या माध्यमातून त्यांनी तीन कोटी रुपयांची मालमत्ता जमा केली होती. मात्र निर्वासित असल्याने त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार त्यांचे विश्वासातील सेवेकरी, स्थानिक नागरिकांच्या नावावर करण्यात येत होते. अशातच बाबांच्या ड्रायव्हर आणि त्यांच्या काही विश्वासू सेवेकरी अशा चौघांनी मिळून त्यांच्या हत्येचा कट रचल्याची आणि मालमत्तेच्या हव्यासापोटी हा कट तडीस नेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चिश्ती बाबांची पत्नी गरोदर असल्याने बाळाच्या जन्मानंतर बाबा संपत्तीचा वारस त्या बाळाला करतील अशी भीती संशितांना असल्याने त्यांनी बाबांची हत्या केल्याचा संशय नाशिकचे ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील (SP Sachin Patil) यांनी व्यक्त केला आहे.

धर्मगुरू जरीफ चिश्ती यांच्या मारेकऱ्यांच्या मागावर पोलिसांचे तीन पथक होते. दरम्यान पोलिसांच्या या पथकांनी बदलापूर येथे दडी मारून बसलेल्या घटनेतील चौघा संशयितांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये गणेश उर्फ देवा झिंजाड-पाटील (वय २८ जि. अहमदनगर), बाबाचा कार चालक रवींद्र तोरे (वय २५, जि. अहमदनगर), पवन आहेर (वय २६, रा. येवला) आणि गफार अहमद खान असे या चौघास संशयितांची नावे आहे. दरम्यान या घटनेतील दोन संशयित अद्यापही फरार असून पोलिसांकडून त्या दोघांचा शोध सुरू आहे. फरार असलेल्या दोघा साथीदारांचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही ताब्यात घेण्यात यश येईल असं नाशिकचे ग्रामीण अधीक्षक सचिन पाटील यांनी म्हटलं आहे.