४१ टक्के पगारवाढ आम्हाला मान्य नाही, आमचा संप कायम..!

नाशिक । प्रतिनिधी

४१ टक्के पगारवाढ आम्हाला मान्य नसून आम्हाला राज्य कर्मचाऱ्यामध्ये विलीनीकरण करण्यात यावे, जोपर्यंत समावेश होत नाही, तोपर्यंत संप कायम असेल असे मत नाशिकमधील एसटी कर्मचाऱ्यांनी मांडले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून नाशिकमध्येही हा संप कायम आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसापासून मंत्री अनिल परब आणि इतर राजकीय नेत्यांमध्ये बैठकी सुरु होत्या. त्यामुळे यांनतर काही तोडगा निघेल अशी आशा होती मात्र मंत्री परब यांनी ४१ टक्के पगारवाढीचा घोषणा केली. त्याचबरोबर पगार हा महिन्याच्या दहा तारखेलाच होईल, अशी घोषणा केली आहे. मात्र या घोषणेला देखील एसटी कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. यात नाशिकमधील एसटी कर्मचाऱ्यांनी देखील पाठिंबा दर्शविला आहे. याबाबत नाशिकतक ने एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत यावर त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या.

यावेळी एसटी कर्मचारी म्हणाले कि, एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, त्याचबरोबर मागणी मान्य होईपर्यंत एकही बस डेपो बाहेर जाऊ देणार नाही असा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. नाशिकमध्येही एसटी कर्मचारी संपावर ठाम असल्याचे दिसून आले. यावेळी आंदोलन स्थळी पोलीस बंदोबस्त तैनात होता.