दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

जव्हार । प्रतिनिधी

येथील शासकीय माध्यमिक शाळेतील दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने तिच्या राहत्या घरी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली. मोनिका धाकलू मोरघा (१५) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

जव्हार तालुक्यातील ढाकपाडा येथील मोनिका धाकलू मोरघा (१५) या हि विद्यार्थिनी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा विनवळ येथे इयत्ता दहावीत शिकत होती. दरम्यान ढाकपाडा ते विनवळ असा येऊन जाऊन प्रवास करीत होती. मात्र सोमवारी मोनिकाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती.

याबाबत सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आश्रम शाळेत माहिती देण्यात आली. अशी माहिती प्रकल्प कार्यालयाकडून मिळाली. मृत्यूचे कारण अद्याप कळलेले नसून तिच्यावर मंगळवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालय जव्हार येथे शवविच्छेदन करण्यात आले असून जव्हार पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.