नाशकाला पुन्हा पावसाने झोडपले! मान्सून झाला सक्रीय

नाशिक शहरात आज सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाने शहराला पुरते झोडपले असून काही ठिकाणी पाणी तुंबले आहे. अचानक झालेल्या या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील दुध बाजार परिसरात अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले त्यामुळे व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली.

सकाळपासून जाणवत होता उकाडा

सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि चार वाजेच्या सुमारास मुसळधारेचे आगमन झाले. नाशकात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसामुळे सर्व खड्ड्यांमध्ये पाणी भरत असून यामुळे नागरिकांना वाहने चालवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर हे खड्डे बुजवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

हवामान विभागाचा होता इशारा

मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यामुळे राज्यासह देशात पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिली आहे. महाराष्ट्रातील काही भागात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे आता हवामानातही बदल दिसून येत आहे . दिवसाही वातावरण उष्ण असलं तरी आता रात्री थंडी जाणवतेय. हवामान खात्याच्या दिलेल्या माहितीनुसार, मान्सून पुढचे चार दिवस सक्रीय राहणार आहे.