घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी अंबड पोलिसांच्या ताब्यात..

By चैतन्य गायकवाड |

नाशिक : नाशिकच्या अंबड पोलिसांनी (Ambad police) कौतुकास्पद कामगिरी केली आहे. घरफोडीच्या १४ गुन्ह्यांची उकल करण्यात अंबड पोलिसांना यश आले आहे. अंबड पोलिसांनी या घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींपैकी काही आरोपी हे सराईत असल्याची माहिती मिळाली आहे. नाशिक शहर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे (Police Commissioner Jayant Naiknavare) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, या १४ घरफोडीच्या घटनांपैकी १३ घरफोडीचे गुन्हे हे अंबड पोलिस स्टेशन हद्दीतील आहे. तर घरफोडीची १ घटना ही सातपूर पोलिस स्टेशन (Satpur police station) हद्दीतील आहे. या घरफोडीच्या गुन्ह्यातील एका मुख्य संशयितासह त्याच्या २ साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंबड पोलिसांनी ताब्यात घेतलेले संशयित आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर उस्मानाबाद, परभणी याठिकाणी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या संशयित आरोपींकडून पोलिसांनी तब्बल २८ तोळे सोने, २ मोटार सायकल, एक ओमीनी गाडी व एक लॅपटॉप असा एकूण 20 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलिसांनी उकल केलेल्या या गुन्ह्यातील अभिषेक उद्धव विश्वकर्मा हा मुख्य संशयित आरोपी असून, करण कडूसकर आणि अभिषेक राजगिरे असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. हे तिन्ही संशयित आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर उस्मानाबाद व परभणी येथे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पकडलेल्या संशयितांपैकी एक संशयित दिवसा घरांची रेकी करत असे. मग रात्रीच्यावेळी ते घरफोडी करायचे.

ही कामगिरी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, परिमंडळ-२ चे पोलिस उपायुक्त विजय खरात (DCP Vijay Kharat), सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) सिद्धेश्वर धुमाळ, सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक (PI) नंदन बगाडे, श्रीकांत निंबाळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) शिंदे, पोलिस उपनिरीक्षक (PSI) संदीप पवार, पोलिस हवालदार पानसरे, पोलिस नाईक गायकवाड, पोलिस नाईक पवन परदेशी, पोलिस शिपाई आहेर, पोलिस शिपाई वाघचौरे, पोलिस शिपाई जनार्दन ढाकणे, पोलिस शिपाई भुरे, पोलिस शिपाई सानप, पोलिस शिपाई राकेश राऊत, पोलिस शिपाई योगेश शिरसाठ, पोलिस शिपाई नागरे, पोलिस शिपाई मोतीराम वाघ, पोलिस शिपाई सोनवणे व पोलिस शिपाई दिनेश नेहे यांनी ही कामगिरी केली.