शिवसेनेच्या हातून कायदेशीर लढाईत ‘धनुष्यबाण’ निसटणार ?

By चैतन्य गायकवाड

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात शिवसेनेचे जवळपास ३९ आमदार सामील झाले आहेत. विधानभवनात झालेल्या बहुमत चाचणीत (majority test) शिवसेनेचे आणखी एक आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याने, हा आकडा एकूण ४० वर गेला आहे. त्यामुळे, एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार आहेत. त्यामुळे कायदेशीर लढाईत एकनाथ शिंदे यांच्या ‘या’ गटाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी केवळ शिवसेनेचे आमदारच फोडले नाही, तर ‘आम्ही म्हणजेच शिवसेना’ असल्याचा दावा देखील केला आहे. त्यामुळेच ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह (bow and arrow sign) शिवसेनेच्या (Shivsena) हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना वेळ पडल्यास नव्या चिन्हावर लढण्याची तयारी ठेवा, असे निर्देश दिल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक ट्विट (tweet) केले आहे. ‘जब “खोने” के लिए कुछ भी ना बचा हो तो “पाने” के लिए बहुत कुछ है!. जय महाराष्ट्र!’, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. दरम्यान, या ट्विटचा नेमका अर्थ काय याविषयी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र न्यायालय लढाईत पराभव झाल्यास आपल्याला ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह सोडावे लागू शकते, याची जाणीव उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना झाली का? असा प्रश्न आता या ट्विटमुळे निर्माण झाला आहे.

खा. संजय राऊत यांचे ट्विट…

दरम्यान, पक्षचिन्हाचा हा वाद निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेल्यास शिवसेनेची अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना खरी, की एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी? असा प्रश्न उद्भवल्यास निवडणूक आयोग शिवसेनेची ओळख असलेले ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गटाकडून वेळोवेळी आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत, तसेच ‘आमचा गट’ ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, असा दावा वारंवार केला जातो. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाकडून ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर दावा केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदेशीर लढाईत शिवसेनेच्या हातून ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह निसटणार का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.