नाशकात पर्यटन स्थळावरील टवाळक्यांना मिळतोय पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद..!

नाशिक: एकीकडे नाशिक शहरासह (Nashik) जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पाऊसामुळे जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्य बहरलं आहे. तर दुसरीकडे मात्र या पर्यटन स्थळांवर (Nashik tourism) हुल्लडबाजीच्या घटना समोर येत आहेत. या हुल्लडबाजी करणाऱ्यांमुळे पर्यटनाला येणाऱ्या इतर पर्यटकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे पोलिसांकडून आता या टवाळखोरांवर कारवाई होताना दिसून येत आहे. काही ठिकाणी तर अशी हुल्लडबाजी करत धिंगाणा घालणाऱ्यांना पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद देखील दिला आहे.

नाशिकमध्ये पावसाळी पर्यटन स्थळांचा मुख्यतः त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar), इगतपुरी (Igatpuri) आणि पहिने (Pahine) या ठिकाणी असलेल्या धबधब्यांचा (Waterfall) पर्यटक आनंद घेत असतानाच धबधब्यांच्या परिसरात मात्र कधी रस्त्यावरील तरुणांचा डान्स तुफान व्हायरल होतो. तर कधी मारामारी करत हैदोस घालणाऱ्या टवाळखोरांचा. या घटना पाहता आता पोलिसांकडून पर्यटन स्थळावर कडक वॉच ठेवला जात आहे. आणि पर्यटन स्थळावर हुल्लडबाजी करणाऱ्या टोळक्यांना पोलिसाच्या दंडुक्याचा प्रसाद लाभत आहे. त्यासोबतच हैदोस घालणाऱ्यांना पुन्हा असा काही प्रकार घडल्यास कठोर कारवाईचा इशारा पोलीस प्रशासनाकडून दिला जातोय. एवढंच नाही तर वेळ पडल्यास फौजदारी गुन्हा देखील दाखल करण्यात येईल असा इशारा पोलिसांतर्फे देण्यात येत आहे.

पहिने धबधब्यावर टवाळखोरांचा हैदोस

निसर्ग सौंदर्याने नटलेले नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळ म्हणजे पहिने धबधबा. हा धबधबा नाशिक शहरापासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर आहे. याठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्यांमध्ये तरुणांचा समावेश अधिक आहे. काही दिवसापूर्वीच पहिने या गावातील घाट रस्त्यावरील तरुणांच्या तुफान डान्स व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर पहिने धबधब्याच्या पाण्यातील तरुणांचा हैदोस सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओत तरुणाचे दोन गट पाण्यांमध्येच एकमेकांत भिडले होते. त्यामुळे पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. अशात नागरिकांनी पर्यटनस्थळी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, रस्त्यावर हुल्लडबाजी करणे, मद्य सेवन करत धिंगाणा घालणे, आदी प्रकार खपवून घेतले जाणार नाही नसता थेट कारवाई केली जाईल, असा इशारा नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील (SP Sachin Patil) यांनी दिला आहे.

पहा व्हिडिओ

https://youtu.be/CUUILnKGDzY