अलंगुणमधील पूरग्रस्तांना ‘एक हात मदतीचा’

नाशिक: सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) अलंगुण (Alangun) येथील पुरामुळे अतोनात नुकसान झालेल्या कुटुंबाना सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करणार असल्याचे प्रतिपादन धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघातील आमदार मंजुळा गावित यांनी अलंगुण येथील नुकसानग्रस्त सर्व कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप करताना केले.

अलंगुन गावातील पूरग्रस्त ग्रामस्थांना शिंदे गटातील धुळे येथील अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांच्या वतीने तालुक्यातील अलंगुण येथील ४१ पुरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप करण्यात आले. १२ जून रोजी सकाळचे वेळी अलंगुण जवळील बंधाऱ्याचा सांडवा धसून निर्माण झालेल्या पुरामुळे काही घरं पाण्याखाली जाऊन तर काहींचे घरसामान वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सुदैवाने त्यावेळी जीवीतहानी झाली नाही. नुकसान झालेल्या कुटुंबाना सर्व स्तरातून मदत मिळत आहे. सुरगाणा तालुक्यातील सतखांब येथील तुळशिराम गावित यांनी व त्यांच्या पत्नी आमदार मंजुळा गावित यांनी अलंगुण येथे पुरग्रस्तांची भेट घेऊन त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट दिले. याप्रसंगी माजी आमदार जे.पी.गावित, सुभाष चौधरी, पांडुरंग भोये, तुळशिराम गावित आदींसह पुरग्रस्त कुटुंब आणि अलंगुण ग्रामस्थ उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे अलंगुण येथील बंधाऱ्याचा सांडवा धसून पूर आला आणि मोठं नुकसान झालं. ज्यांची घरे पाण्याखाली गेली. शेतीचेही नुकसान झाले. तसेच मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. या सर्व नुकसानग्रस्त कुटुंबाना, शेतकऱ्यांना पुर्वपदावर येण्यासाठी मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याकडे लक्ष घालण्यास सांगून योग्य ती मदत करू असे आश्वासन यावेळी आमदार मंजुळा गावित यांनी केले आहे. तर पुरामुळे शेतजमीन पुर्णपणे उखडली गेली आहे. नुकसानग्रस्त कुटुंबाना सामाजिक संस्थांकडून मदत मिळत आहे. मात्र शेतजमिन पूर्णपणे धूवून निघाल्याने शासनाकडून शेतकरी व नुकसानग्रस्त कुटुंबाना योग्य ती आर्थिक मदत मिळायला हवी अशी आशा माजी आमदार जे.पी.गावित यांनी व्यक्त केली आहे.