नाशिक विभागातून ३६ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई

नाशिक । प्रतिनिधी

एसटी महामंडळाने गैरहजर कर्मचाऱ्यांवरील कारवाई अधिक तीव्र केली असून बुधवारी आणखी दहा कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले असून सेवा गमविलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या आता ३६ वर पोहोचलेली आहे. तर आणखी आठ कर्मचाऱ्यांवर दोषारोपपत्र ठेवण्यात आल्याने त्यांच्यावर टांगती तलवार असणार आहे.

एकीकडे न्यायालयीन लढाई सुरु असली तरी कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यावरील आजवरची सर्व कारवाई मागे घेतली जाण्याचीदेखील घोषणा परिवहन मंत्र्यांनी केली होती. त्यानंतर काही प्रमाणात कर्मचारी परतले असलं तरी मोठ्या प्रमाणात कर्मचारी संपावरच असल्याने त्यांच्यावर आता कारवाई सुरु झाली आहे. त्यानुसार नाशिक विभागातील जवळपास ३६ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आल्याने त्यांची सेवा संपुष्ठात आली आहे.

बुधवारी जिल्ह्यातील आणखी दहा कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले तर ०८ कर्मचार्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली जाण्याची शक्यता असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. महामंडळाकडून कारवाईचे सत्र सुरु असताना संपवरील कर्मचाऱ्यांनी ठामपणे लढा देण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. नाशिक आगार एक येथे कर्मचाऱ्यांचा लढा सुरूच असल्याचे म्हणत फलकाद्वारे सांगण्यात आले आहे.

दोन महिने होऊन गेले, तरी अद्याप एसटी कामगारांचा संप मात्र सुरूच आहे. अद्यापही विलीनीकरणाचा लढा सुरूच असल्याने अजून किती काळ एसटी कर्मचाऱ्यांचा संप असणार याकडे लक्ष लागून आहे. एकीकडे संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून खांजगी वाहने मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची लूट करताना दिसत आहे. त्यामुळे प्रवाशी वर्गाला देखील एसटी ची आतुरता असल्याने एसटी चा संप मिटावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.