नाशकात आता खड्डे खोदणारांची खैर नाही! मनपा आयुक्तांचा इशारा

नाशिक । प्रतिनिधी
सध्या नाशिक शहरात अनेक ठिकाणी रस्त्याचे खोदकाम सुरु आहे. काही कामे अनेक दिवसांपासून सुरु असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. यातील काही कामांना परवानगी घेतली जाते तर काही कामांना परवानगी घेतली जात नाही, आता यापुढे विनापरवाना खोदकाम केल्यास त्यांना थेट तुरुंगात पाठवण्यात येईल असा इशारा महापालिका प्रशासन आयुक्त रमेश पवार यांनी दिला आहे.

नाशिक शहर सध्या विकसित होत आहे. यामुळे वाहनांची संख्या देखील वाढते आहे. मात्र शहरात अनेक नवनवीन कामे होत असल्याने अनेकदा रस्त्यावर खड्डे खोदण्याचे काम सर्रास केले जाते. या कामास अनेकदा विलंब लावला जातो. परिणामी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. मात्र आता अशा बहाद्दरांना चाप बसणार आहे. कारण मनपा आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार याबाबत नवे धोरण आखले आहे.

मनपा आयुक्तांनी आखलेल्या नव्या धोरणानुसार आता नाशिक महापालिकेच्या रीतसर परवानगी शिवाय कोणी खोदकाम केले तर संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा मनपा आयुक्तांनी दिला आहे. तसेच विभागीय अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश त्यांनी दिले आहेत. एमआरटीपी ऍक्टमध्ये त्यासंदर्भात फौजदारी तरतूद असून त्यानुसार कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

नाशिक शहरात सध्या वेगवेगळ्या पद्धतीची खोदकाम सुरू असून त्यात स्मार्ट सिटी, महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी तसेच अन्य खाजगी कंपन्यांचा समावेश आहे. महापालिकेला रोड डॅमेज चार्जेस मोठ्या प्रमाणात मिळत असते तरी त्यातही वाढ केल्यास उत्पन्न वाढू शकते, मात्र दुसरीकडे खोदकामाची परवानगी घेऊन मंजूर मार्गा पेक्षा अधिक मार्गावर खोदकाम केले जाते. परवानगी देणारा अधिकारी मुख्यालयातच असतो. मात्र प्रत्यक्ष घटनास्थळी वेगळेच काम केले जाते आणि ते विभागीय अधिकाऱ्यांना माहिती नसते.

त्यामुळे आता अशा प्रकारचे खोदकाम करताना विभागीय अधिकाऱ्यांना माहिती असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता नाशिक महापालिकेच्या रीतसर परवानगी शिवाय कोणी खोदकाम केले तर संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा मनपा आयुक्तांनी दिला आहे.