ऑर्डर ऑर्डर ! सटाणा न्यायालयाचा चेहरा मोहरा बदलणार!

नाशिक । प्रतिनिधी

राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून सटाणा न्यायालयाच्या नूतन विस्तारित इमारतीच्या बांधकामास मंजुरी मिळाली आहे. तसेच या नूतन इमारतीच्या बांधकामासाठी १० कोटी ३७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.

सटाणा न्यायालयाची इमारत अतिशय जुनी झाल्याने आणि कामकाज करण्यात जागा कमी पडत असल्याने सटाणा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.पंडित भदाणे, अॅड.रवींद्र पगार व नाशिक बार असोसिएशनचे सचिव अॅड.जालिंदर ताडगे यांनी सटाणा न्यायालय विस्तारित इमारतीच्या बांधकामासाठी निवेदनाद्वारे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार मंत्री छगन भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. या प्रस्तावास शासनाची मंजुरी मिळाली असून इमारतीच्या बांधकामाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.

सटाणा येथे नवीन विस्तारित न्यायालयीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मा.उच्च न्यायालय यांच्याकडून शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास मान्यता मिळण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार या नूतन इमारतीच्या बांधकामास मंजुरी मिळाली असून यासाठी १० कोटी ३७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यामाध्यमातून या नूतन इमारतीत दोन मजली वाहनतळ, गॅस पाईप, बायो डायजेस्टर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर रुफ टॉप, दिव्यांगांसाठी रॅम्प, फर्निचर, पाणीपुरवठा, विद्युतीकरण, अग्निशमन यंत्रणा, आवरभिंत व गेट, अंतर्गत रस्ते, मैदानाचा विकास, वाहनतळ, अंडरग्राउंड पाण्याची टाकी, पंप हाऊस, वातानुकूलित यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा विकसित करण्यात येणार आहे.