शिंदे खून प्रकरणातील मुख्य संशयितास अटक

नाशिक । प्रतिनिधी

पेठरोड परिसरातील सराईत भाजीपाला व्यापाऱ्याच्या खुन प्रकरणामध्ये गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली. पैशाच्या देवाण घेवाण वरून पेठरोडवर राजेश शिंदे यांचा खून करण्यात आला होता. सिद्धांत संदीप चक्रनारायण (वय २२, रा.वैशालीनगर , पेठरोड, नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेठरोड वर दोन दिवसांपूर्वी राजेश शिंदे या भाजीपाला व्यापाऱ्यांचा खून झाला. या खून प्रकरणांतील दोन संशयित आरोपीना या पूर्वी अटक केली आहे. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता शिंदे यांच्या डोक्यात दगड घालणारा संशयित आरोपी सिद्धांत संदीप चक्रनारायण असल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हापासून सिद्धांत याचा शोध घेणे सुरु होते. दरम्यान संशयित सिद्धांत हा रामकुंड परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

दरम्यान पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमण्यात आले. या पथकाने सापळा रचून संशयित आरोपी सिद्धांत यास शिताफीने अटक केली. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ०२ चे पोलीस उपनिरीक्षक विजय लोंढे, पोलीस उपनिरीक्षक पोपट करवळ, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, सोमनाथ शार्दूल, राजेंद्र घुमरे, राजाराम वाघ, संजय सानप, पोलीस नाईक प्रशांत वालझाडे, सुनील आहेर, यादव डंबाळे यांनी केली आहे.