बत्ती गुल! नाशिकमध्ये संपला ९९ टक्के प्रतिसाद, कोणत्याही परिस्थितीत माघार नाही; कर्मचाऱ्यांचा एल्गार

महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संपाला आजपासून सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये देखील वीज कर्मचारी संघटनांनी सहभाग घेतला असून ९९ टक्के कर्मचारी संपात सहभागी आहेत. राज्यसह जिल्ह्यात संपाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. शहरात काही भागांमध्ये वीज सुरळीत असून काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे. संपावर ठाम राहण्याची कर्मचाऱ्यांची भूमिका असून कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही असा एल्गार त्यांनी पुकारला आहे.

आज (दि. ४) बुधवार पासून महावितरणचे  अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात झाली आहे. खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. नाशिकमध्ये देखील वीज कर्मचारी संपात सर्व ३१ संघटनांचा सहभाग आहे. यातील ९९ टक्के कर्मचारी संपात सहभाग, सध्या तरी वीजपुरवठा शहर आणि ग्रामीण भागात सुरळीत असल्याची माहिती आहे. मात्र काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे.  एकलहरे विद्युत निर्मिती प्रकल्प सध्यातरी सुरू मात्र संप सुरूच राहिल्यास वीज निर्मितीवर परिणाम होऊ शकतो.

सकाळी १० वाजता सर्व संघटनाचे प्रमुख पदाधिकारी आणि कर्मचारी नाशिक मधील मुख्य विद्युत कार्यालयाजवळ एकत्र जमले होते. यावेळी संपावर ठाम राहण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. कर्मचारी म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत माघार नाही. तसेच औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. दंगा नियंत्रक पथकही तैनात झाले आहे.

अद्याप काही ठिकाणी वीज सुरळीत सुरू असून काही ठिकाणचा वीज पुरवठा बंद झाला आहे. काही भागात वीज पुरवठा बंद झाल्यानं अडचणी निर्माण झाल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी संप जर लवकर मागे घेतला नाही, तर नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

संप का पुकारला?

महावितरणाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तीन जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संपावर जाण्याची घोषणा केली होती. खासगीकरणाला विरोध करण्यासाठीच महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला वीज वितरण परवाना देण्याच्या सुरू असलेल्या हालचालींबाबत महावितरण कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. नाशिक जिल्ह्यातील ३१ संघटनांचा यात सहभाग आहे.