पालकमंत्र्यांच्या भुजबळ फार्मवर निषेधाची काळी रांगोळी

नाशिक । प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करणारे विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक (काळे विधेयक) महाविकास आघाडी सरकारने मुद्दाम घाई घाईने पारित करून घेतले. या माध्यमातून प्र.कुलपती हे नवीन पद तयार करून सन्मा कुलपतींचे अधिकार उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांना दिले जाणार आहेत. विद्यापीठांना राजकारणाचा अड्डा बनविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

भविष्यात कुलगुरूंच्या नियुक्त्या ,विद्यार्थ्यांच्या पदव्या या सगळ्यातच आरोग्य सेवक भरती परीक्षा, म्हाडा परीक्षा प्रमाणे करोडोंच्या भ्रष्टाचाराचे विषय करण्यासाठी यांना हे प्र.कुलपती पद पाहिजे का? हा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. या काळया विधेयकाला विरोध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाने मुख्यमंत्र्यांना १० लाख पत्र पाठवले. त्यानंतर उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना मिस कॅाल्स, मेसेज, ई-मेल पाठवून निषेध व्यक्त केला.

राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घ्यावी, यासाठी आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणुन आज भारतीय जनता युवा मोर्चा युवती विभाग नाशिक महानगराच्या वतीने नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या भुजबळ फार्म निवासस्थानाबाहेर पहाटे ६.०० वाजता निषेधाची काळी रांगोळी काढण्यात आली.

यावेळी भाजयुमो शहर सरचिटणीस ऋषिकेश आहेर, शहर युवती प्रमुख साक्षी दिंडोरकर, स्वाती माळोदे, मयुरी शुक्ल, लीना मोरे आदी उपस्थित होते.