ओबीसी आरक्षणासंदर्भात आज पुन्हा सुनावणी

नाशिक । प्रतिनिधी

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होणार असून निवडणुकीबाबत न्यायालय आज काय निर्णय देणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. यापूर्वी देखील या संदर्भात सुनावणी झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं याआधी दोनदा स्थगिती दिली आहे. इम्पिरिकल डेटा गोळा करूनच आरक्षण देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं याआधीही दिले होते. त्यावरूनच तिढा निर्माण झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्याने ओबीसी आरक्षित जागा वगळून अन्य वॉर्डातील निवडणुका होत आहेत. सरकारने या निवडणुका एकतर एकत्र घ्याव्यात किंवा पुढे ढकलाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून ओबीसी नेत्यांचा याबाबत लढा सुरु आहे. यावरून छगन भुजबळ यांनी देखील वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान आजच्या सुनावणी दरम्यान निकाल येण्याची शक्यता असून महापालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकांचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यातील ओबीसी नेत्यांचे सुनावणीकडे लक्ष लागले आहे.