नाशिककर निर्बंध पाळा, अन्यथा कठोर निर्णय घ्यावे लागतील!

नाशिक । प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासुन नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा विस्फोट होत असून नाशिक जिल्ह्यात पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत ३०३५ ने वाढ झाली आहे. यामुळे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचे नाशिककरांना अलर्ट केले आहे. परिस्थिती न सुधारल्यास कठोर निर्बंधांचा सामना करावा लागेल अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

यामध्ये प्रत्यक्ष नाशिक शहरात तब्बल १६७८, ग्रामीण भागात ११८५, मालेगाव ६१ आणि जिल्हा बाह्य १११ रुग्ण दाखल झाले असून जिल्ह्यात १ हजार ३५० रुग्ण बरे झाल्याची नोंद आहे. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात १०,९८२ कोरोना रुग्ण उपचारा खाली आहे. त्यामुळे नाशिक महानगरात रुग्णांचा पुन्हा वाढत चाललेला हा आकडा धास्ती वाढविणारा आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मांढरे यांनी कठोर पाऊले उचलण्यास सुरवात केली आहे. जर नाशिक जिल्ह्यात अशाच पद्धतीने रुग्णसंख्येत वाढ होत राहिल्यास कठोर निर्बंध लावण्यात येतील. त्याचबरोबर विकेंडला शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली. अनेकजण विना मास्क फिरताना आढळले. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे बाजारातील गर्दी टाळण्याचे आवाहन त्यांनी केले मात्र असेच चालू राहिले तर अन्यथा कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नाशिक प्रशासनाकडून नाशिककरांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्ह्यातील वाढणारा पॉसिटीव्हिटी दर पाहता तपासणीचे प्रमाण वाढविणे अपेक्षित असून, त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे. कोरोनाची सद्यस्थिती पाहता वॉर रूम तयार करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.