‘द्या टोले, नाना पटोले’, नाशिकमध्ये भाजपचे आंदोलन

नाशिक । प्रतिनिधी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना बोलणे चांगलेच महागात पडले असून नाशिकमध्ये भाजपने आंदोलनाद्वारे पटोलेंना धारेवर धरले आहे.

दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा ‘मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो’ असा धमकी देणारा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. यावरून ठिकठिकाणी निवेदने, आंदोलन करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक भाजपने रात्री बारा वाजता सरकारवाडा पोलीस ठाण्यात याबाबत निवेदन दिले.

त्यांनतर आज या घटनेच्या निषेध करण्यासाठी भाजप रस्त्यावर उतरली आहे. शहरातील सातपूर परिसरात नाना पटोलेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर पटोलेंना अटक करण्याची मागणी देखील आक्रमक भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे म्हणाले कि, कार्यकर्त्यांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना उद्देशून मारण्याची व शिव्या देण्याची धमकी दिली आहे. हे अत्यंत गैर आहे. ते कदापी सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

तर आमदार सीमा हिरे यावेळी म्हणाल्या कि, सर्वप्रथम या वक्त्यव्याचा निषेध करतो. अशा पद्धतीने कोणी पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरात असतील तर त्यांना तात्काळ अटक करावी. एकीकडे नारायण राणे बोलल्यावर त्यांना अटक केली जाते, तर दुसरीकडे पटोले यांना वेगळा न्याय का, असा सवाल त्यांनी यावेळी केला.