सातपुरात सावकारी जाच, त्रासाला कंटाळून तरुणाने घेतला गळफास

नाशिक । प्रतिनिधी

खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून सातपुरमध्ये एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी खासगी सावकाराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

निलेश बाळासाहेब सोनवणे (वय ३०, रा. सातपूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. निखिल भावले असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहेत. मयत तरुणांच्या आई व भावाने याबाबत सातपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत निलेश याने संशयित भावले यांच्याकडून काही कारणासाठी १० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र यासाठी सावकार वारंवार त्रास देत असल्याचे निलेशच्या घरच्यांनी सांगितले. तर काही दिवसांपूर्वी खाजगी सावकाराने सदर तरुणाची दुचाकी ओढून नेली होती.

दरम्यान या सर्व कारणांमुळे निलेश हा नैराश्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले. कर्जाच्या नैराश्येतून त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खाजगी सावकारीतून बेकायदा कर्ज देऊन कर्ज वसुली साठी तगादा लावला जात असल्याचे समोर आले आहे. यातूनच सातपूर येथील अशोक नगर भागात राहणाऱ्या निलेशने आपलं जीवन संपवल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी मयत निलेशची आई व भावाने यांसंदर्भांत तक्रार दाखल केल्यानंतर सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सातपूर पोलीस अधिक तपास करत आहे..