मुंबई । प्रतिनिधी
भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कोकणातील चिवला बंगल्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश नुकतेच देण्यात आले होते. त्यानंतर नारायण राणे यांचा जुहू परिसरातील अधीश या बंगल्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे.या प्रकरणी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी या बंगल्यावर पाहुनियासाठी गेले आहेत.
मुंबई पालिकेच्या नोटीसनंतर नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांचे दोन्ही सुपूत्र आक्रमक झाले होते. नारायण राणे यांनी आपल्या बंगल्यात एका इंचाचेही अनधिकृत बांधकाम नसल्याचा दावा केला होता. तर नितेश राणे यांनी पालिकेच्या नोटीसला योग्यवेळी प्रत्युत्तर दिले जाईल, असे म्हटले होते. अशातच आज (दि.२१) महानगरपालिकेचे अधिकारी या बगळ्अयाच्धिया पाहणीसाठी जुहूला गेले आहेत. याठिकाणी पालिका अधिकाऱ्यांकडून अनधिकृत बांधकामाबाबत तपासणी आणि मोजमाप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका या बंगल्यासंदर्भात कोणती कारवाई करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी के वेस्ट वॉर्ड (अंधेरी वेस्ट) द्वारे वॉर्ड अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने ही नोटीस राणे यांना पाठवण्यात आली होती. एमएमसी अॅक्ट अंतर्गत सेक्शन ४८८ अन्वये ही नोटीस बजावण्यात आली आहे. के-वेस्ट वॉर्ड आणि इमारत प्रस्ताव विभागाचे पथक शुक्रवारी जुहू तारा रोडवरील अधिश बंगल्यावर येऊन तपासणी आणि बेकायदा बांधकामाबाबत मिळालेल्या तक्रारीची खात्री करून घेणार असल्याचे नोटिशीत म्हटले होते.
राणेंच्या बंगल्यात बेकायदा बांधकाम झाल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने दौंडकर यांनी पुन्हा महापालिका प्रशासनाला यासंदर्भात स्मरणपत्र पाठवले. त्यानंतर आता महापालिका प्रशासनाने ही कार्यवाही सुरू केली आहे.