अन जिल्हाधिकारी झाले जुळ्या बहिणींचे ‘पालक’

नाशिक । प्रतिनिधी

कोरोना प्रादुर्भावामुले अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेकांच्या कुटुंबाचा आधार गेला, तर कुणी पोरके झाले. कोरोनाने आईवडील असे दोन्ही पालक गमावल्यामुळे तर ५२ बालके अनाथ झाली झाली आहेत. या बालकांचे पालकत्व आता नाशिक च्या अधिकाऱ्यांनी स्वीकारले असून, यामध्ये जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी देखील ममत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे.

कोरोना काळात होत्याचे नव्हते झाले, अनेकांचे संसार उध्वस्त झाले. यात हजारो बालके अनाथ झाली. या सर्व बालकांना आता मायेचा आधार मिळाला आहे. जिल्हा धिकारी सुरज मांढरे यांनी या अनाथ बालकांचे पालकत्व स्वीकारण्याची साद महसुलातील अधिकाऱ्यांना घातली होती. या हाकेला साद देत अनेक अधिकारी पुढे आले. या माध्यमातून अनेक अधिकाऱ्यांनी हि पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी दोन जुळ्या मुलींना आधार दिला असून त्यांच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे.

कोरोनाच्या महामारीत आई वडील वडील गेल्यामुळे जिल्ह्यात ५२ बालके अनाथ झाली. अगदी एक ते दीड वर्षांच्या मुलांवरील मायेचे छत्र हरपले आहे. सध्या या मुलांचे नैतिक पालकत्व त्यांच्या नातेवाईकांकडे आहे. आता जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या बालकांचे पालकत्व स्वीकारले असून, या मुलांसाठी शासकीय मदतीबरोबरच अशा नातेवाईकांच्या पाठीमागे उभे राहण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.

दरम्यान अनाथ बालकांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अधिकारी मदतदुत म्हणून उभे राहतील. पाच लाखांची मुदतठेव , ११०० रुपये प्रतिमहिना खर्च मिळकतीवर नाव लावणे, यासाठी कार्यरत राहणार आहे. या पालकांच्या भूमिकेत अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यापासून ते उपविभागीय अधिकारी , नायब तहसीलदार, तहसीलदार यांनी पालकत्व स्वीकारले आहे.