नवीन नाशिक परिसरातील सावता नगर मध्ये घरफोडी

नाशिक । प्रतिनिधी
नवीन नाशिकच्या सावता नगर परिसरामधील नागेश्वर महादेव मंदिर च्या बाजूला असलेल्या एका घरामध्ये चोरी झाल्याची घटना घडली असून हा चोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, नवीन नाशिक परिसरातील सावता नगर भागात रविवारी रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास एका अज्ञात चोरट्याने घरफोडी केल्याची घटना घडली आहे. नागेश्वर महादेव मंदिर च्या बाजूला असलेल्या एका घराचे तब्बल तीन दरवाजांचे कडी कोंडा तोडून घरामध्ये शिरकाव केला. घराच्या मालक बेबी ठाकूर या मागील 4 ते 5 दिवसांपासून बाहेरगावी गेल्या असल्याने याच संधीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला.

सदर चोरट्याने हत्याराने बाहेरील लोखंडी दरवाजाचे कडी कोयंड्यासह कुलूप तोडले. तो दरवाजा उघडताच मध्ये असलेला लाकडी दरवाजाचे देखील कुलूप तोडत लोखंडी कपाट व एक लाकडी कपाट या दोघांचेही कुलूप तोडले. कपाट मध्ये असलेले सर्व सामान खाली जमिनीवर फेकून दिले. या घरफोडीत लाखोंचा मुद्देमाल गेल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

या परिसरामध्ये नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी तब्बल १३ सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असून या सीसीटीव्ही मध्ये चोर कैद झालेला आहे. याबाबत माहिती मिळताच अंबड पोलिसांनी धाव घेत परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे. दरम्यान, सिडको परिसरामध्ये दिवसेंदिवस होत असलेल्या घरफोडी थांबवण्यासाठी रात्रीचे गस्त वाढवावी अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे.