सिन्नरच्या सिक्रेट कॉफी शॉप चालकावर गुन्हा दाखल

सिन्नर । प्रतिनिधी

येथील सिन्नर महाविद्यालयासमोर असलेल्या सिक्रेट कॉफी शॉप चालकावर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिन्नर पोलिसांनी कारवाई केली.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता कॉफी शॉमध्ये गर्दी जमविल्याप्रकरणी सिन्नर पोलिसांनी कॉफी शॉप चालक सतीष साजनसिंग बिसेन (१९), रा. अपना गॅरेज झोपडपट्टी, सिन्नर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सिन्नर महाविद्यालयासमोर सतीश बिसेन यांचे सिक्रेट कॉफी शॉप असून, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमावलीचे संबंधित कॉफी शॉप चालकाने पालन न करता गर्दी जमवून कॉफी शॉप चालवत होता. सोमवारी (दि.१७) दुपारी पावणेतीनच्या सुमारास सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल हेमंत तांबडे, पोलीस नाईक सी. डी. मोरे, एन. ए. पवार गस्त घालत असताना पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मिळालेल्या खबरीवरून त्यांनी गस्ती पथकाशी संपर्क साधून संबंधित कॉफी शॉप चालकावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गस्ती पथक सिक्रेट कॉफी शॉपमध्ये गेले असता तेथे कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास आले.

नियमापेक्षा जास्त ग्राहकांची गर्दी, मास्क, सॅनिटायझरचा वापर न करणे, सुरक्षित अंतर न राखणे यासारखे नियम न पाळता कॉफी शॉप सुरू असल्याने पोलिसांनी कॉफी शॉप चालक सतीश साजनसिंग बिसेन याच्याकडे चौकशी केली असता त्यानेदेखील मास्क न लावता पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल हेमंत तांबडे यांच्या फिर्यादीवरून कॉफी शॉप चालक सतीश बिसेन याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.