कधी तीन रंगांची फुलकोबी पाहिलीत का?

नाशिक । प्रतिनिधी

सध्या पारंपरिक शेतीसह नवनवीन प्रयोग करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिल्याचे पाहायला मिळते आहे. जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील वासोळ येथील प्रयोगशील शेतकरी जिभाऊ देसले यांनी रंगीत फुलकोबीचा नवा प्रयोग केला आहे. विशेष म्हणजे या नव्या प्रयोगातून त्यांना भरघोस उत्पन्नही मिळाले आहे.

येथील प्रगतशील शेतकरी म्हणून देसले यांची ओळख आहे. देसले यांच्या शेतात गहू, मका आदी पिकांसह टोमॅटो ची लागवड केली जाते. मात्र देसले यांना काहीतरी नवं करण्याची धडपड होती. साथीला आपल्या दोन मुलांना घेऊन रंगीत फुलकोबीच्या लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. जिभाऊ देसले यांचे चिरंजीव हितेंद्र देसले आणि पुतण्या हेमंत देसले यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रंगीबेरंगी फुलकोबीबद्दल माहिती मिळवली. परंतु, त्यांना रंगीत फुलकोबी बियाणे उपलब्ध होत नव्हते. अखेर देसले यांना एका कंपनीच्या माध्यमातून बियाणे उपलब्ध झाले.

दरम्यान देसले यांनी मार्गदर्शन घेत रंगीत फुलकोबीच्या लागवड केली. या फुलकोबीची साधारणत: ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात लागवड केली जाते. या फुलकोबीला परिपक्व होण्यासाठी ७५ ते ८५ दिवस लागतात. सध्या ही रंगीत फुलकोबी २५ ते ३० रुपये प्रतीकिलो दराने विक्री होत आहे. देसले यांना २० गुंठ्यासाठी लागवडीपासून ते काढणीपर्यंत २५ ते ३० हजार रुपये इतका खर्च आला आहे.

तब्बल अडीच ते तीन महिन्यानंतर देसले यांच्या शेतात रंगीत फुलकोबी पाहायला मिळाली. अखेर त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला. देसले यांनी वीस गुंठ्यात तीन रंगांची फुलकोबी पिकवली असून, यात नारंगी, पिवळा आणि हिरव्या रंगाचा समावेश आहे. या फुलकोबीला मेट्रो सिटी, फाईव्ह स्टार हॉटेल्स त्याचप्रमाणे इतरही शहरी भागात मागणी चांगली आहे. ग्रामीण भागात या फुलकोबीचे उत्पादन घेतल्याने परिसरातील शेतकऱ्यांना जणू नवलच वाटत आहे. तसेच रंगीत फुलकोबी पिकवल्याने इतरही शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे.

सध्या रंगीबेरंगी फुलकोबी बघण्यासाठी परिसरातून गर्दी होत आहे. अनेक शेतकरी देसले यांच्या शेताला भेट देत आहेत. जाणकारांच्या मते महाराष्ट्रातून पहिल्यांदाच हा प्रयोग नाशिक जिल्ह्यात जिभाऊ देसले यांनी यशस्वी करून दाखविला आहे.