नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील स्वयंम पाटील याने क्रिडा प्रकारातील स्विमिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. या कामगिरीबद्दल आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२२ देवून स्वयंम पाटील यांस गौरविण्यात आले आहे.

ही बाब नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी असल्याचे सांगत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्वयंम पाटील व त्याच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, शैक्षणिक क्षेत्र, क्रीडा, कला आणि संस्कृती, शौर्य, समाजसेवा आणि नवतंत्रज्ञान अशा सहा क्षेत्रात अनन्य साधारण कामगिरी करणाऱ्या बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येतात. देशातील २९ मुलांना आज प्रातिनिधीक स्वरूपात दूरदृयश्प्रणालीद्वारे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे.

याअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील स्वयंम पाटील या १४ वर्षीय बालकाने एलिफंट गुफा ते गेट वे ऑफ इंडिया हे १४ किलोमीटर खाडी ४ तास ९ मिनीटांत पोहून पार केल्याचा विक्रम स्वयंम पाटीलने केला आहे. याची दखल घेत केंद्र सरकारने त्यास क्रीडा क्षेत्रातील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२२ देवून सन्मानीत केले. ही बाब नाशिक करांसाठी अभिमानाची बाब असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, स्वयंम पाटील यास यापूर्वी देखील लिमका बुक ऑफ रेकॉर्ड २०१७ , दिव्यांगजन सशक्तिकरण हेतू राष्ट्रीय पुरस्कार २०१८, वंडर बुक ऑफ इंटरनॅशनल रेकॉर्ड २०१८, जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२० तसेच वर्ल्डस् रेकॉर्ड इंडिया अशा पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांची ही यशस्वी घोडदौड यापुढेही सुरू राहील अशा शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. तसेच महाराष्ट्रातील शिवांगी काळे, जुई केसकर, जिया राय, पुरस्कार विजेत्या बालकांचे देखील अभिनंदन करुन त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मंत्री छगन भुजबळ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.