नाशिक पोलिसांकडून मागील चार दिवसांत पंधराशे दुचाकीस्वारांना ‘दणका’

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या हेल्मेट सक्ती मोहिमेला आता यश येताना दिसत आहे. अनेक दुचाकी चालक आता हेल्मेट घालूनच शहरात दुचाकी चालवताना दिसत आहेत.

नाशिक शहरात विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करत गेल्या चार दिवसात १ हजार ५८७ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई केली आहे. दरम्यान विना हेल्मेट चालकांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता त्याचे परिणाम दिसत आहेत. मात्र अजून काही चालक नियम तोडत असल्याने काल ४४० विना हेल्मेट दुचाकी चालकांना दंड ठोठावला आहे.

शहरात हेल्मेटच्या सक्तीबाबत पोलीस आयुक्तालयाकडून वेगवगेळ्या पद्धतीने अनोखे प्रयोग राबविले जात आहेत. या अभियानातंर्गत आत वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईला गेल्या गुरुवारपासून सुरवात केली आहे.

पहिल्याच दिवशी तब्बल ४५३, तर दुसऱ्या दिवशी ४१२ आणि शनिवार , रविवार प्रत्येकी अनुक्रमे ३६१ असे एकूण १ हजार ५८७ विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांना दंडाचा दणका देण्यात आला. चार दिवसांत ८ लाख २४ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.