धक्कादायक! मोबाईल नसल्याने अभ्यास अपूर्ण, सुरगाण्यात विद्यार्थिनीची आत्महत्या

नाशिक । प्रतिनिधी
एकीकडे शाळा पुन्हा एकदा सुरु झाल्या असताना सुरगाणा तालुक्यातील एका अकरावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. भारती तुकाराम चौधरी वय १७ (रा. हातरुंडी) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.

सुरगाणा तालुक्यातील पोस्ट बेसिक अनुदानित आश्रमशाळा अलंगुण येथे ११ वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केलीय आहे. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास राहत्या घरातील पडवीमध्ये लाकडी दांड्याला फडकीने गळफास लावून आत्महत्या केली. सध्या पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र महाविद्यालये अद्यापही बंद असून ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. अशातच मोबाईल नसल्याने अभ्यास अपूर्ण राहत असल्याने या विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले आहे.

दरम्यान याबाबत विद्यार्थिनीचे काका हिरामण चौधरी यांनी सांगितले की, कोरोनामुळे एक ते दीड वर्षापासून शाळा बंदच असल्याने ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी ॲन्ड्रॉईड मोबाईल नाही, पुरेसे नेटवर्क पण उपलब्ध नाही, मोबाईल घेण्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती नाही तसेच सारखे घरी राहून कंटाळली होती. या कारणांमुळे नैराश्य आल्याने तिने आत्महत्या केली असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरगाणा तालुक्यातील हि दुसरी घटना असून जानेवारी महिन्यात एका पाचवीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आता पुन्हा हातरुंडी येथील विद्यार्थिनीच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.