‘मालेगाव मॅजिक’ मागे काढ्याचा प्रताप?, मंत्री छगन भुजबळ म्हणाले..!

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक शहरात गेल्या दहा पंधरा दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच पहिल्या दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव मध्ये मात्र अद्यापही कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आहे. यामुळे या मालेगाव मॅजिकमध्ये दडलंय काय? असा सवाल उपस्थित होत असून यासाठी आरोग्य विद्यापीठाच्या पथकाने संशोधन करण्यास सुरवात केली आहे.

कोरोनच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत नाशिकसह मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाची रुग्णसंख्या वाढत होती. यामुळे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागत होते. अनेकांना बेड मिळणे अशक्य झाले होते. शहरासह मालेगावमध्ये कोरोनाचे महासंकट ओढवले होते. सर्वाधिक रुग्ण मालेगावमध्ये आढळून येत होते. तेथील डॉक्टरांनी केलेल्या उपचाराच्या जोरावर काही दिवसांतच मालेगावची परिस्थिती सामान्य झाली होती. मालेगावात एक नवा पॅटर्न उदयास आला होता. तो पॅटर्न म्हणजे मालेगावचा काढा. म्हणजे या दुसऱ्या लाटेत अनेक जणांनी मालेगावचा काढा पिण्यास प्राधान्य दिले होते. त्यामुळे त्यावेळी अनेकांनी काढ्यामुळे बरे झाल्याचे सांगितले होते.

दरम्यान सद्यस्थितीत नाशिक शहराची रुग्णसंख्या झपाटयाने वाढत असताना मालेगाव शहर मात्र आटोक्यात आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू कानेटकर यांनी चर्चा करीत मालेगावला भेट दिली. यांनतर येथील काही नागरिकांचे नमुने संशोधनासाठी घेण्यात आले. सध्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे एक पथक यावर संशोधन करत असून कमी रुग्णसंख्येमागे काढ्याचा काही परिणाम दिसतो आहे, किंवा इतर काही कारणे आहेत का? याचा शोध घेतला जात आहे.

सध्या मालेगाव येथील लोकांची रोग प्रतिकारशक्ती कशामुळे वाढली? याचा शोध घेतला जात आहे. पालकमंत्री भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधत याविषयी माहिती दिली. त्यामुळे येत्या काही दिवसांत मालेगाव मॅजिकचे रहस्य उलगडणार आहे.