‘मालेगाव मॅजिक’ मागे दडलंय काय?

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे, मात्र असे असताना पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेले मालेगाव मात्र यावेळी लांब असल्याचे दिसून आले आहे.

पहिल्या व दुसऱ्या लाटेत मालेगाव शहरात कोरोनाने हाहाकार माजवला होता. नाशिक जिल्ह्यातून पहिले हॉटस्पॉट केंद्र देखील झाले होते. मात्र सध्याची परिस्थिती याउलट असून नाशिक शहरात रुग्णसंख्येत वाढ होत असतांना मालेगावात फक्त २७ रुग्ण आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

एकीकडे नाशिक शहरातील रुग्णसंख्या दररोज हजारच्या आसपास असताना मालेगावात आद्यपही रुग्णसंख्या स्थिर आणि शांत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे, कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी मालेगावचा दौरा करत आरोग्य यंत्रणा आणि तज्ज्ञांची बैठक घेतली. त्यानंतर याबाबत पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. याबाबत बोलताना जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत मालेगावमध्ये पाच हजार आणि दुसऱ्या लाटेत ८ हजार रुग्ण सापडले. मात्र, सध्या येथे फक्त ६५ रुग्ण आहेत. याचे आश्चर्य वाटत आहे. याच मालेगाव मॅजिकचा शोध घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान आता पालकमंत्री भुजबळ यांच्या सूनचनेनंतर निवृत्त लेफ्टनंट जनरल तथा कुलगुरू डॉ.माधुरी कानेटकर यांच्या नेतृत्वात होणार ‘मालेगाव मॅजिक’ वर संशोधन होणार आहे. यासाठी मालेगाव कोरोना मुक्तीचे रहस्य शोधण्यासाठी पथक तयार करण्यात येणार आहे. यासाठी अडीच हजार नागरिकांचे नमुने घेऊन त्यांच्या इम्युनिटी वाढीचा अभ्यास करण्यात येणार आहे.

एकीकडे राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतांना मालेगाव शहरात मात्र एवढी कमी रुणसंख्या कशी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.