महापालिका निवडणुकांचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर !

नाशिक । प्रतिनिधी

ओबीसी आरक्षण आणि त्यावरून रंगलेले राजकीय नाट्य यापेक्षा राज्यातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका आता कोरोना, ओमायक्रॉन संसर्गावर अवलंबून आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह नाशिक जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने महापालिका निवडणुकांचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री भुजबळ यांनी दिली.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठीकीनंतर भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले कि, काही तासांपूर्वीच उत्तरप्रदेशसह चर राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या. मात्र तेथील कोरोनाची सद्यस्थिती विषयी कल्पना नाही, मात्र मुंबई, पुणे, नाशिक या शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता आगामी महापालिका निवडणुका या कोरोनाच्या शेवटावर अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असताना पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. एकीकडे महापालिकेच्या प्रभागांची रचना, मतदार याद्या काही अंशी निश्चित झाल्या होत्या. त्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणूक जाहीर झाली तरी प्रशासन सज्ज होते. पण, कोरोनाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्याने असल्याने पुन्हा निवडणुकांमध्ये खोळंबा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.

सर्वोच्च न्यायाालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली. मात्र राज्यात सध्या सर्वत्र कोरोना, ओमायक्रॉनचे रुग्ण वाढायला लागले आहेत. त्याचा परिणाम निवडणुकींवर नक्कीच होणार आहे. कोरोनाचा संसर्ग कोठपर्यंत जाणार आणि कोठे थांबणार याचा अंदाज कोणालाच नसल्याने महानगरपालिकांच्या निवडणुकांवर अनिश्चिततेचे सावट आहे. जितक्या लवकर ही साथ आटोक्यात येईल, परिस्थिती पूर्वपदावर येईल तितक्या लवकर निवडणुका होतील, असे संकेत त्यांनी दिले आहेत.