उत्तर प्रदेशसह चार राज्यांच्या निवडणुका जाहीर, असा आहे निवडणूक कार्यक्रम

नाशिक । प्रतिनिधी

अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या पाच राज्यातील निवडणुकांचे निवडणूक कार्यक्रम () अखेर जाहीर करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब (Punjab), उत्तराखंड (Uttarakhand), मणिपूर (Manipur), गोवा (Goa) विधानसभा निवडणूका (Assembly Elections) तारखा जाहीर झाल्या आहेत.

उत्तर प्रदेश मध्ये १० फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान ७ टप्प्यांत होणार आहेत. पंजाब, उत्तराखंड आणि गोवा मध्ये १४ फेब्रुवारी दिवशी मतदान एकाच टप्प्यांत होणार आहे तर मणिपूरला २७ फेब्रुवारी आणि ३ मार्चला मतदान आहे. या सर्व निवडणुकांचे निकाल १० मार्चला जाहीर केले जाणार आहेत. तर या चार राज्यात एकूण ६९० जागांवर निवडणूका होणार आहेत. यामध्ये युपी मध्ये ४०३, गोवा मध्ये ४०, मणिपूर मध्ये ६०,पंजाब मध्ये ७० आणि उत्तराखंड मध्ये ६० जागांवर निवडणूक होईल असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. या निवडणुकांकरिता १६२० पोलिंग बुथ उभारण्यात येणार असून प्रत्येक विधानसभा क्षेत्रांपैकी ०१ बुथची महिलांकडे जबाबदारी असणार आहे.

कोरोना काळात मतदान घेण्याचे मोठे आव्हान निवडणूक आयोगासमोर असून निवडणुका कशा पार पडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारांना यंदा ऑनलाईन देखील अर्ज दाखल करता येणार आहे. फिजिकल कॉन्टॅक्ट टाळण्यासाठी या पर्यायाचा वापर करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. निवडणुकांच्या मतदानाकरिता ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट चा वापर केला जाणार आहे.

८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, डिसॅबिलिटी असणारे आणि कोविड १९ रूग्ण पोस्टल बॅलेट द्वारा मतदान करू शकणार आहेत. महिला आणि दिव्यांगांसाठी या निवडणूकांदरम्यान मतदानासाठी विशेष सोय केली जाणार आहे. तर निवडणूक केंद्रांवर काम करणार्‍यांना बुस्टर डोस दिला जाणार आहे. त्यामुळे सुरक्षित वातावरण निर्माण केले जाणार आहे. तसेच त्यांना फ्रंट लाईन वर्कर्सचा दर्जा असणार आहे.

१५ जानेवारी पर्यंत रोड शो, पदयात्रा किंवा फिजिकल रोड शो घेतले जाऊ शकत नाहीत. तसेच निवडणूक निकालानंतरही विजय सार्वजनिक स्वरूपात साजरा करता येणार नाही. रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत रॅली घेता येऊ शकणार नाही. डोअर टू डोअर प्रचारासाठी जाण्यासाठी देखील ५ जणांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे.