सोमवारपासून जिल्ह्यातील आश्रमशाळाही बंद

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सोमवारपासून जिल्ह्यातील आश्रमशाळाही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या शाळा १० जानेवारीपासून ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समिती बैठकीत घेण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले. यावेळी तेम्हणाले कि, ज्या प्रमाणे जिल्ह्यातील सर्व शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद राहतील त्याचप्रमाणे आश्रमशाळा राहणार असल्याचे सांगितले. नागरिकांनी आता स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्यावी, अशीच रूग्णवाढ होत राहिल्यास भविष्यात कठोर निर्णय घेण्याची वेळ प्रशासनावर येऊ देऊ नये असे आवाहनही पालकमंत्री भुजबळ यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते यावेळी म्हणाले कि, राज्यातील मोठ्या शहरात कोरोनाचा आलेख वाढत आहे. ही सर्व परिस्थीती पाहता मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणी घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे शहरातही पहिली ते नववीपर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

शहरातील सर्वच सरकारी, खाजगी कार्यालये, व्यापारी संस्था, खाजगी संस्था यांना ‘नो व्हॅक्सीन नो एन्ट्री’ याची अंमलबजावणी करावयास सांगितले आहे. मात्र याची अंमलबजावणी योग्य पध्दतीने होताना दिसत नाही. लोक पाहिजे तसे मनावर घेताना दिसत नाहित. त्यामुळे लस नाही तर प्रवेशच नाही अशी सक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात पहिली लस अनेकांनी घेतली आहे मात्र दुसरी लस अद्यापही अनेक जणांची घेतलेली नाही. तर अनेकांचा दुसरी लस घेण्याचा कालावधी संपला असला तरी अद्याप अनेकांनी दुसरी लस घेतलेली नाही त्यांनी तातडीने लस घ्यावी असे आवाहनही भुजबळ यांनी केले.