मनपा हद्दीतील शाळांबाबत आयुक्तांचा महत्वाचा निर्णय

नाशिक । प्रतिनिधी
नाशिक महापालिका हद्दीतील शाळा दहा तारखेनंतर सुरु करणार असल्याची माहिती पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान ओमिक्रॉन’ या नवीन व्हेरिएंटमुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. देशासह राज्यात आता कुठेतरी सर्वकाही सुरळीत असतांना नव्या व्हेरिएंटने डोकेदुखी वाढली आहे. त्यातच राज्य शासनाने पहिली ते चौथीच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे लहान मुले आता उत्साहाने शाळेत जाण्यास तयार होती. मात्र यामुळे आता पालकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे नाशिक मनपा हद्दीतील शाळा या १० तारखेनांतर होणार अशा सूचना पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या आहेत. तर नव्या व्हेरिएंटची परिस्थिती पाहून शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

राज्य शासनाने काही दिवसापूर्वी पहिलीपासूनच्या सर्व शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसऱ्या बाजूला दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ऑमिक्रॉन’ या नव्या कोरोना व्हेरियंटने टेन्शन वाढविले आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की शाळा सुरु होणार हे निश्चित असून तूर्तास तरी निर्णयात कोणताही बदल झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले.