एमआयएम-राष्ट्रवादी युतीची चर्चा, राष्ट्रवादीच्या नेत्यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई । प्रतिनिधी

एमआयएम (AIMIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिली आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया दिली. त्यानंतर काँग्रेसनेही प्रतिक्रिया दिली. त्यानंतर हळूहळू राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही सावध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), राजेश टोपे (Rajesh Tope) आदी मंडळींनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आगामी काळात ही ऑफर आणि राजकीय प्रतिक्रिया यावर जोरदार चर्चा रंगण्याची चिन्हे आहेत.

राजकीय प्रश्नांवर जर कोणाला एकत्र येऊन काम करावे असे वाटत असेल आणि त्यातही समविचारी पक्षांना एकत्र यावसं वाटत असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे. विकास कामासाठी सर्व एकत्र येऊन जर राज्याचे भले करण्याचा विचार ठेवत असतील तर ही गोष्ट नक्कीच चांगली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

एमआयएमला महाविकासआघडीमध्ये घ्यायचे किंवा नाही याबाबत वरिष्ट नेतेच नर्णय घेतील. याबाबत बोलण्याचा मला अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राजेश टोपे आणि इम्तियाज जलील यांची भेट झाल्यानंतर जलील यांनी प्रसारमाध्यमांसमोर जाहीरपणे राष्ट्रवादीला ऑफर दिली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु झाली. दरम्यान, राजेश टोपे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुन शिवसेनेची चांगलीच गोची झाल्याचीही चर्चा सुरु आहे.

जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या मातोश्रींचे निधन झाले. त्यानंतर त्यांना भेटण्यासाठी म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे गेले होते. अशा वेळी कोणी राजकीय चर्चा करेल असे मला अभिप्रेत नाही. मला खात्री आहे राजेश टोपे यांनी अशी काही चर्चा केली नसेल. परंतू, या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबत माझ्याकडे तपशील नसल्यामुळे फारसे भाष्य करता येणार नाही. दरम्यान, कोणाशी आघाडी करायची असेल तर एमआयएमला प्रथम भाजप विरोध असल्याचे कृतीतून दाखवावे लागेल, असेही जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, एमआयएम पक्षासोबत युती हा विचारही एक गंभीर आजार आहे. राज्यात महाविकासआघाडी भक्कम आहे. जो पक्ष औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकतो. जाऊन गुडघे टेकतो. तो शिवसेना, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनतेचा विरोधकच आहे, अशा शब्दात संजय राऊत (Sanjay Raut on MIM) यांनी टीकास्त्र सोडले आहे.