नाशिक जिल्ह्यातील वणव्यांची मालिका थांबणार कधी?

नाशिक । प्रतिनिधी
नेमीची येतो पावसाळा याप्रमाणे जानेवारी, फेब्रुवारी नंतर नाशिक जिल्ह्याच्या विविध भागात सातत्याने वणवे लागतात. गेली अनेक वर्षें वणवे लागण्याचे किंवा लावण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत. मागील महिनाभरात ब्रम्हगिरी, चामरलेणी पायथा, मायना डोंगर परिसर, तसेच दोनदा रामशेजला आग लागल्याचे प्रकार घडले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही वणव्याचा कहर नाशिकच्या सह्याद्रीचे गडकोट, डोंगर, टेकड्यांच्या परिसरात सुरू आहे. पर्यावरण जैवविविधतेचे अतोनात नुकसान करणारा वणवा सातत्याने सुरूच असल्याने हि वणव्यांची मालिका थांबणार कधी? हा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे. शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागा मार्फत हजारो झाडे लावण्यात येतात. पण अनेकदा अज्ञातांकडून तसेच उन्हाच्या तीव्रतेमुळे आग लागण्याचे प्रकार घडतात. या वणव्यांमुळे बहुमूल्य वनसंपदा नष्ट होत असली तरी वणवे रोखण्यासाठी वन विभागाकडून ठोस कृती होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे वणव्यांची मालिका सुरूच आहे. राज्य शासनाच्या वन पर्यावरण विभागाच्या वणवा मुक्त अभियानाला यामुळे खीळ बसली असून कागदावर असलेले हे अभियान कुचकामी ठरत आहे. हे वाढत्या वणव्यांच्या घटनांमुळे दिसत आहे. त्यामुळे या आगी लागतात की लावल्या जातात, याची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे.

रामशेज किल्ल्यावर (दि.१८) रोजी दुपारी आग लागली. या आगीचे वणव्यात रूपांतर होत रामशेजच्या पश्चिम पायथ्यापासून थेट किल्ल्याच्या मध्य माथ्यापर्यंत पोहोचला. तर दोन दिवसांपूर्वीच गिरणारे जवळील मायना डोंगरावर आग लागून वनसंपदा नष्ट झाली. अशावेळी गड संवर्धक, पर्यावरण प्रेमी संस्था तसेच तरुणांनी अथक प्रयत्नानंतर या वणव्यांवर नियंत्रण मिळवले. या दोन्ही तिन्ही घटनांत हजारो हेक्टर जमिनीवरील परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. त्या वणव्यात कित्येक झाडे-झुडपे आगीच्या कवेत येऊन जळून खाक झाली. कोटी रुपये देऊनही पर्यावरणाचे नुकसान भरून निघणार नाही, अशी अवस्था जिल्ह्यातील गड किल्ल्यांची, डोंगर रांगांची झाल्याचे पाहायला मिळते. मग हे थांबणार कधी?

दरम्यान वणव्यात हजारो एकरवरील जैविविधता नष्ट होते. त्यामुळे हे कधी न भरून येणारे नुकसान असून वन, जंगल, घाट, किल्ले असुरक्षित असल्याने वणवा लागण्यापूर्वी वनक्षेत्रात जाळपट्टे उभारणी गरजेचे आहे. तसेच स्थानिक नागरिकांना, वन समित्यांना वणवा विझवण्याचे प्रशिक्षण नसल्याने वणवा वाढत जातो. परिणामी सर्व जळून नष्ट झाल्यावर यंत्रणेला जाग येते, मग अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण दिले जाते. यावरून पर्यावरण वन खाते या घटनांना गांभीर्याने घेत नसल्याचे स्पष्ट होते.

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेने अनेकदा याबाबत वन विभागाला वणव्यात होणारे नुकसान, वणवा रोखण्यासाठी उपाय लेखी सुचवले आहेत, टास्क फोर्स बैठकीत ही हे उपाय लघुगटाच्या अहवालात मांडले. मात्र यावर काहीही उपाययोजना होताना दिसत नाही. वनविभागाने संवेदनशील वनक्षेत्र जाहीर करावी, कायमस्वरूपी वनपाल नेमून भक्कम यंत्रणा उभारावी. वणवा लावणाऱ्या गुन्हेगारांना शोधणार्यांना ठोस बक्षीस जाहीर करावे. तसेच वनक्षेत्रात उघड्यावरील रात्र पार्ट्या थांबवाव्या, ज्वालाग्रही वस्तुंना वनक्षेत्रात बंदी करावी, वनक्षेत्र, गडकोट याठिकाणी जाणारे येणाऱ्यांची नोंदणी करावी, त्यासाठी वनविभागाने चौक्या उभाराव्यात. – राम खुर्दळ, संस्थापक शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, नाशिक