नाशिक मनपा प्रशासक आक्रमक, थकबाकी न भरणाऱ्यांचे नळ कनेक्शन ‘गुल’

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिकेवर प्रशासक (Administrator) राजवट आल्यानंतर नाशिक (Nashik) महापालिका (Municipal Corporation)आक्रमक झाली असून, शहरातील तब्बल ५७९ घरांना जप्ती वॉरंट बजावूले असून, चक्क १२७ नळ कनेक्शन कापण्यात आले आहेत.

नाशिक महापालिकेवर १४ मार्चपासून प्रशासक म्हणून आयुक्त कैलास जाधव यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी अनेक कामांचा सपाटा लावला आहे. अशातच महापालिकेच्या प्रमुख उत्पन्नाचे स्त्रोत असलेली घटपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठी पाठ फिरवणाऱ्या नागरिकांकडे मोर्चा वळवला आहे. महापालिकेच्या या दोन्ही विभागांनी वेळोवेळी सूट देऊनही ग्राहकांनी थकबाकी भरण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या करचुकव्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान याबाबत आता शंभर टक्के वसुलीसाठी करविभागाने दंड थोपटले असून, बड्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. जप्तीच्या नोटीसा बजावण्यासह कारवाई सुरू करण्यात आली असून नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्षांनी करवसुलीसाठी जोर देणे आवश्यक असताना कार्यकाळात प्रयत्नच झाले नसल्याचे सांगण्यात आले. आयुक्त कैलास जाधव यांनी सूत्रे हाती घेताच पहिले प्राधान्य महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी दिले आहे.

नाशिक महापालिकेच्या पाणीपट्टीची थकबाकी १२२. ८३ कोटींच्या वर गेली आहे. घरपट्टीची थकबाकी ३६५.४० कोटींवर गेली आहे. एकूण ४८८.२३ कोटींच्या थकबाकीचा डोंगर महापालिकेच्या समोर उभा आहे. नाशिक महापालिकेने २०२१-२२ आर्थिक वर्षात घरपट्टीतून १५० कोटींची वसुली करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. आतापर्यंत १०७ कोटींची वसुली झाली असून त्यात मागील थकबाकी ४०० कोटींवर गेल्याचे पाहायला मिळाले आहे.

सध्या महापालिकेची आर्थिक स्थिती म्हणावी तितकी चांगली नाही. मात्र, तरीही घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली करण्यात दिरंगाई होताना दिसते आहे. यावर लेखापरीक्षकांनी यापूर्वीच बोट ठेवले आहे. त्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या पूर्वी ही कारवाई सुरू झाली आहे. महापालिकेने पाणीपट्टी आणि घरपट्टी बाबत अभय योजना जाहीर केली होती. मात्र, नागरिकांनी याकडेही पाठ फिरवली आहे.