नाशिकककर रहाडीचा मनसोक्त आनंद घ्या, मात्र ‘आवाज बंद’

नाशिक । प्रतिनिधी
नाशिककरांना रंगपंचमीला रंगांची मनसोक्त उधळण करता येणार असली तरी डिजेच्या तालावर थिरकता येणार नाही. याबाबतची माहिती पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिली आहे. त्यामुळे उद्या होणारी रंगपंचमी डीजे शिवाय साजरी करावी लागणार आहे.

नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात यंदा होळी सोबत धुळवड साजरी करण्यात आली. त्यानंतर वेध लागले ते रंगपंचंमीचे. दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर यंदा धुमधडाक्यात रंगपंचमी साजरी करण्यात येणार होती. त्यासाठी शहरातील महत्वाच्या रहाडी देखील सजल्या असताना आता रंगपंचमीला डीजे ला परवानगी नसल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. त्यामुळे धुमधडाक्यात रंगपंचमी साजरी करण्याचे स्वप्न पाहणार्‍या तरुणाईची काहिशी निराशा झाली आहे.

उद्या रंगपंचमीचा सण असून त्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस आयुक्तालयात सर्व प्रमुखांची झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी रंगपंचमीला होणारा डिजेचा दणदणाट व इतर वाद्यांवर बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र पारंपारिक वाद्यांच्या वापर करुन रंगपंचमी साजरी करण्यास मुभा देण्यात आली आहे.

दरम्यान नाशिकच्या रहाडीचा विशेष उत्सव साजरा करण्यात येणार असला तरी डिजेचा दणदणाट बंद असणार आहे. याबाबत पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी हि परवानगी नाकारली आहे. त्यामुळे उद्या होणारी रंगपंचमी डीजे शिवाय साजरी करावी लागणार आहे.