नट बोल्ट पासून ते सुखोई पर्यंतच्या उत्पादनांनी नाशिककर भारावले!

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकमध्ये उत्पादित होत असलेल्या अगदी ‘पिन ते ऐरोप्लॅन’ सारख्या वैविध्यपूर्ण उत्पादनांचा समावेश या प्रदर्शनातुन नाशिककरांना आकर्षित करीत आहे. येथे रॉयल इंकचे पॅकेजिंग मशीन्स इंक जशा आहेत तसेच इपी रॉकचे मायनिंग इक्विपमेंट्स, सुखोई सुद्धा आहे. पोर्टेबल घरगुती वापराचे इलेक्ट्रॉनिक तेल घाणा आहे.

आणि सोलर उत्पादनांची, नव्या तंत्रज्ञानाने परिपूर्ण उत्पादनेही आहेत. इलेक्ट्रिक व्हेईकलचे आजच्या युगातील महत्व अधोरेखित करणारे अनेक स्टॉल्स तर आहेतच शिवाय एस एस इंडस्ट्रीजच्या ऑटोमॅटिक टॉयलेट्सने भेट देणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नाशिकच्या उद्योगातील कामगारांच्या अथक श्रमातून साकारणारी ही उत्पादने येथील उद्योगांची क्षमता दर्शवीत आहेत.

अंबड इंडस्ट्रीज असोसिएशन कडून डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित या औद्योगिक प्रदर्शनाचा समारोप आज (दि. २१) रोजी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी अनबलगण आणि नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. दरम्यान रविवारी सुट्टी असल्याने प्रदर्शनात बघण्याची वेळ एक तास निवडून दिल्याने ते बघण्यास आबालवृद्धांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. तीन दिवसात ७५ हजारहुन अधिक लोकांनी या प्रदर्शन स्थळाला भेट देऊन उद्योजकांचा उत्साह वाढवला. दरम्यान या प्रदर्शनात अगदी नट बोल्ट पासून ते महागाई अवजारे प्रदर्शनात बघण्यास उपलब्ध आहेत. सेल्फी पॉइंट तसेच सुख व विमानाची प्रतिकृती हेसुद्धा उपस्थितांना असेच आकर्षित करीत असल्याने प्रदर्शनाचे रंगत वाढली आहे.

कोविडचा प्रभाव कमी झाल्याने उद्योगजगताला बुस्ट देण्याच्या उद्देशाने मोठ्या धाडसाने आम्ही प्रदर्शन भरवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अनेकांनी त्याच्या यशस्वीतेबद्दल शंका उपस्थित केल्या होत्या. परंतु हे प्रदर्शन कमालीचे यशस्वी झाले. आज प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्याने गर्दीचा उच्चांक होईल यात शंका नाही. – ललित बुब, सरचिटणीस आयमा

नाशिक ते घोटी दरम्यान नवी औद्योगिक वसाहत

अंबड सातपूर आणि सिन्नर येथे उद्योगांसाठी जागा नाही, त्यामुळे नवीन औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी आता नाशिक ते घोटी दरम्यान जागेचा शोध सुरू आहे, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी संजय काटकर यांनी प्रदर्शनात दिली. समृद्धी महामार्ग, मुंबई-नागपूर दरम्यान लवकरच सुरु होणारी बुलेट ट्रेन आणि नियोजित सुरत -चेन्नई महामार्ग यामुळे नाशिकला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे.

समृद्धीचे टर्मिनल अँड नाशिकला नसले तरी समृद्धीचा फायदा नाशिकला मिळवून देण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. माळेगावची जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे डेस्टिनेशन नाशिकचे स्वप्न निश्चित साकार होईल. नाशिकला फुड हब कसे करता येईल या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे काटकर यांनी सांगितले.