नाशिक । प्रतिनिधी
गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) विविध पदांसाठी सरळ प्रवेश भरती प्रक्रिया राबविली जात आहे. याकरिता ऑनलाईन परीक्षा घेतली जात आहे. बुधवारी इंदीरानगर मधील परीक्षा केंद्रावर तोतया परीक्षार्थीने हजेरी लावल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
सुरक्षारक्षकांनी धातुशोधक यंत्राने तपासणी केली असता त्याच्या बुटामध्ये मोबाईल आढळला. तसेच त्याची कागदपत्रेही बनावट असल्याचेही यावेळी स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी डमी उमेदवाराला अटक केली आहे. बुधवारी म्हाडाच्या विविध पदांसाठी ऑनलाईन परीक्षा गुरु गोविंद महाविद्यालयात दुपारी साडेबारा ते अडीच वाजेच्या दरम्यान होती. परीक्षेचे आयोजन टाटा कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून करण्यात आले होते.
दरम्यान परीक्षा सुरु होण्यापूर्वी साडे अकरा वाजेच्या सुमारास प्रवेशद्वारावर आहेर यांनी परीक्षार्थी ज्ञानेश्वर श्रीमंत दिगुळे (२२) याची तपासणी केली. त्याने बुटामध्ये मोबाईल दंडविल्याचे उघडकीस आले. त्याची अंगझडती घेतली असता एक इलेक्ट्रॉनिक डिवाइस देखील सापडले. मूळ आधारकार्ड व ओळखपत्रावरील छायाचित्रांमध्ये तफावत असल्याचे आढळून आले. छायाचित्र हे परीक्षेतील मूळ परीक्षार्थी छोटीराम सीताराम बहुरेचा असल्याचे निष्पन्न झाले.
त्याच्याऐवजी संशयित डमी परीक्षार्थी ज्ञानेश्वर याने परीक्षा केंद्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांनी परीक्षा केंद्रावरून त्यास अटक केली आहे. कनिष्ठ अभियंता आशिष आंबेकर (३८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.