‘सायेब, लय कष्टानं उभं केलंय’, सातपूर परीसरात संसार जमीनदोस्त

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिका अतिक्रमण विभागाकडून शहरातील विविध भागातील अतिक्रमणावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. आज सातपूर परिसरात अतिक्रमण मोहीम तीव्र करण्यात आली. शहरातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली असल्याने स्थानिक नागरिक आणि अतिक्रमण पथकातील कर्मचाऱ्यामध्ये काही ठिकाणी बाचाबाची देखील होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

गेल्या काही दिवसापासून सातपूर परिसरात अतिक्रमण मोहीम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अतिक्रमण करतेवेळी अनेक नागरिकांचा विरोध होताना दिसून येत आहे. असे असताना मात्र, स्थानिकांचा विरोध डावलत, पोलिसांच्या मदतीने जेसीबीच्या साहाय्याने मनपाची अतिक्रमण हटाव मोहीम ही सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून सातपूर परिसरात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेकांच्या तक्रारी लक्षात घेता महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून ही मोहीम सुरू झाली आहे.

येत्या काळात देखील ही मोहीम अशाच प्रकारे सुरु राहणार असून ज्या ज्या नागरिकांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यांनी ते त्वरित काढून घ्यावे अन्यथा कार्यवाहीला सामोरे जावे लागेल असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.