होऊ दे खर्च! ढकांबेच्या जावयाची स्वारी चक्क हेलिकॉप्टरमधून..!

नाशिक | प्रतिनिधी

अलीकडे लग्न अगदी साध्या पद्धतीने केली जातात, तर काही जण फक्त कोर्ट मॅरेज करून नातेवाईकांना जेवू घालतात. मात्र नाशिक मधील एका वधुपित्याने आपल्या जावयाला आणण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर पाठवले. यामुळे या हौशी शेतकऱ्याची जिल्ह्यात चर्चा आहे.

नाशिक जिल्ह्यातील ढकांबे येथील प्रगतिशील शेतकरी गोपीनाथ बोडके यांची एकुलती एक उच्चशिक्षित कन्या वैष्णवी हिचा विवाह पिंपळगाव बहुला येथील शांताराम नागरे यांचा उच्चशिक्षित एकुलता एक मुलगा संकेत यांच्यासोबत नुकताच झाला. पिंपळगाव बहुलापासून बालाजी लॉन्स हे विवाहस्थळ अवघे पाच-सात किलोमीटरवर आहे. मोटारीने आले तर दहा मिनिटेही लागणार नाहीत. परंतु, एवढ्या अंतरासाठी सासऱ्यांनी जावयासाठी चक्क हेलिकॉप्टरच पाठवले.

https://youtu.be/EZ5PTVnglv0

बोडके यांनी लाडक्या कन्येच्या लग्नात नवरदेवाला आणण्यासाठी हेलिकाॅप्टर पाठवले. नवरदेवाच्या घरापासून विवाहस्थळ अवघे पाच कि. मी. असताना हौसेसाठी हेलिकाॅप्टरला मात्र दहा किमीचा फेरा मारावा लागला. यामुळे लग्न आहे घरच, होऊ दे खर्च असंच म्हणायची वेळ आली आहे. या वेगळ्या हौशेची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे.

गंगापूररोडवरील बालाजी लॉन्स येथे हा विवाह सोहळा पार पडला. येथून पिंपळगाव गाव बहुला हे पाच ते सहा किमी अंतरावर पडते. गाडीने आले तर खूप झाले तर पाच ते सात मिनिटांचे अंतर; त्यासाठी जवळच हेलिपॅड उभारण्यात आले. तेथून नवरदेवाला गाडीने विवाहस्थळी आणण्यात आले. अन जावयाला थेट हेलिकॉप्टर पाठवल्याने जावई देखील खुश झाला.

प्रत्येक मुलीच्या वडिलांची इच्छा असते आपल्या मुलीचे लग्न थाटात व्हावे. माझीसुद्धा अशीच इच्छा होती. त्यामुळे लाडक्या कन्येचे लग्न काही तरी वेगळ्या स्वरूपात करायचे ठरवले आणि करून दाखवले. –गोपीनाथ बोडके, मुलीचे वडील