शेतकरी संघटनेचे जिल्हा बँकेच्या गेटवर आंदोलन

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा मध्यवर्ती बँकेने ओढून आणलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव प्रक्रियेला शेतकऱ्यांनी विरोध केला असून शेतकरी संघटनेने जिल्हा बँकेच्या गेटवर आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनातून अनेक शेतकऱ्यांनी लिलाव थांबवण्याची विनंती बँक प्रशासनाला केली आहे.

दरम्यान थकबाकीमुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने ओढून आणलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव आज पासून (दि.०४) करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघर्ष संघटना बँकेच्या बाहेर आंदोलन करत असून शेतकऱ्यांना काही महिन्यांची मुदत वाढवून देण्याची मागणी संघटनेने केली आहे. मात्र जिल्हा बँक प्रशासन लिलाव प्रक्रिया पार पाडण्यावर ठाम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावेळी बँक प्रशासन आणि शेतकरी संघटना यांच्यात बाचाबाची झाल्याचे दिसून आले.

वाहन व ट्रॅक्टर घेण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेकडून कर्ज घेत त्या कर्जाची वेळेत परतफेड न केल्याने थकबाकीदार यांच्याकडून जप्त केलेल्या ११३ ट्रॅक्टर यांचा लिलाव करण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. आजपासून टप्प्या टप्प्याने जाहीर लिलाव होणार आहे. थकबाकीदारांनी कर्जाची परतफेड करत कारवाई टाळावी, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले होते. मात्र आता सर्व वाहनांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय जिल्हा बँक प्रशासक यांनी घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर आजपासून होणाऱ्या जिल्हा बँकेच्या लिलाव प्रक्रियेला शेतकऱ्यांचा विरोध केला असून शेतकरी संघटनेने जिल्हा बँकेच्या गेटवर आंदोलन केले आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या वाहनांचा आणि जमिनीचा होणारा लिलाव हाणून पडण्याची तयारी शेतकरी संघटनेने केली आहे. मात्र बँक प्रशासन ठाम असल्याने यावेळी बँक प्रशासन आणि शेतकरी संघटना यांच्यात बाचाबाची झाली. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतले असून आता संघटना आणि बँक प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.