नाशकात दरोडेखोरांचा हैदोस; आधी वृद्धाला संपवलं आणि मग..!

नाशिक : सिन्नर तालुक्यातील धाडसी दरोड्याला एक दिवस उलटत नाही तोच अंबड एक्सलो पॉइंट परिसरात धाडसी दरोड्याची एक खळबळ जनक घटना घडली आहे. मुख्य म्हणजे चोरीच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांनी दरोड्यात घरात राहणाऱ्या एका ६५ वर्षीय शेतकरी वृद्धाची हत्या केली आहे. बच्चू सदाशिव कर्डीले असं मयताचे नाव असून या घटनेने शहरात एकचं खळबळ उडाली आहे. धारदार शस्त्राने वार केल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर घरातील काही मुद्देमाल आणि ऐवज लंपास केल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. दरम्यान दरोडा आणि हत्येच्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिस दरोडेखोरांच्या मागावर आहेत.

सिन्नरची घटना ताजीच

नाशकात जबरी दरोड्याच्या अनेक घटना घडत आहे. कालच सिन्नर मध्ये जबरी दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लुटल्याची घटना समोर आली होती. एका घरात ८ जणांच्या टोळक्याने शिरून आई व मुलास मारहाण करत महिलेच्या अंगावरील दागिन्यांसह घरातील दागिने व रोकड लुटल्याची धक्कादायक घटना घडली होती. घटना गुरुवारी (दि.२४) सायंकाळी ७:३० च्या सुमारास सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे घडली होती. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर नाशिक शहरातून पुन्हा एक धक्कादायकप्रकार समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या मालमत्तेचाच नाही तर जीविताच्या सुरक्षेचा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे.

सिन्नरच्या घटनेत मुक्ताबाई ज्ञानेश्वर हुल्लुळे (वय ५०) व मुलगा राहुल ज्ञानेश्वर हुल्लुळे (वय ३२) हे घरात होते. सायंकाळी दोघे आपल्या घरातील हॉलमध्ये टीव्ही बघत असताना पुढील बाजूच्या दरवाजाने अचानक ८ जणांच्या टोळक्याने घरात प्रवेश केला. काही कळण्याच्या आत टोळक्याने हातात असलेल्या दोरीने मुक्ताबाई व राहुल यांना बांधून ठेवले. दोघांच्या तोंडाला चिकटपट्टी लावून लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली आणि घरातील ऐवज लुटून नेला. तर आजच्या घटनेत घरातील एका वृध्द व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या केली आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यात ‘दरोडा’ ही एकमेव भीती नाही. तर सशस्त्र दरोडा टाकला जातोय ही त्याहून अधिक मोठी भीती आहे. अशात सशस्त्र दरोड्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. मात्र आता या चोरांची मजल शस्त्रांनी फक्त धाक दाखवून लुटण्यापर्यंतचं नाही तर जीव घेण्यापर्यंत गेली आहे. त्यामुळे कुठेतरी नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.