आपचे आंदोलनकर्ते स्वप्नील घिया यांच्यावर गुन्हा दाखल

नाशिक । प्रतिनिधी

विनापरवानगी अन्नत्याग उपोषणास बसलेल्या आपचे पदाधिकारी स्वप्नील घिया यांच्या विरोधात भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्नील घिया हे गेल्या सात दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. ८५० स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांची रहिवासी घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे घिया यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर घिया हे अन्नत्याग उपोषण करत आहते. मात्र हे आंदोलन पोलिसांच्या पूर्वपरवागीने नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम आदमी पक्षाचे पदाधिकारी स्वप्नील घिया यांच्या वतीने त्यांच्या राहत्या घरी,द्वारका, काठे गल्ली ,अमृता हाईट्स याठिकाणी फ्लॅटमध्ये नाशिककरांची घरपट्टी आणि पाणीपट्टी नाशिक महानगर पालिकेच्या माफ करावी यासाठी अन्नत्याग उपोषण आंदोलन केले जात होते.

मात्र या आंदोलनाला कुठल्याही प्रकारची पूर्व परवानगी घेतलेली नसल्याने नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात घिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर घिया यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर नाशिकच्या शासकीय रुग्णालयात अधिक उपचार सुरू आहे.