पावसाचा हाहाकार; २ दिवसांत पुराच्या पाण्याने घेतले ‘इतके’ बळी

सुरगाणा तालुक्यातील भिंतघर येथे दोन युवक पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे. वाहून गेलेल्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. अशात बुबळी येथे कामानिमित्त गेलेले तीनजण भिंतघर येथे राहत्या घरी परतत होते. मात्र हे तिघेही जामनेमाळ जवळील फरशी पुलावरून वाहत्या पाण्यातून मोटार सायकलने जात असताना पडले. यात सुरेश कडाळी व विजय वाघमारे हे दोघे पुराच्या पाण्यात वाहून गेले. तर मागे बसलेला प्रभाकर पवार सुदैवाने बचावला आहे. पुलापासून काही अंतरावर मोटरसायकल आणि छत्र्या मिळून आल्या. मात्र, वाहून गेलेले उर्वरित दोघेजण अद्याप मिळून आलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे याबाबत पोलिसांना देखील कळवण्यात आले असून पोलिसांकडून दोघांचा शोध सुरू आहे.

जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; पुरात सात जण वाहून गेल्याच्या घटना

नाशिक जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती पहायला मिळत आहे. अशात पुरात वाहून जाण्याच्या अनेक घटना देखील घडल्या आहेत. नाशिकमध्ये पुरात आतापर्यंत सात जण वाहून गेले आहेत. कालच दिंडोरीतील कोचरगाव येथील विशाखा बुधा लिलके ही सहा वर्षीय चिमुकली आळंदी नदीच्या प्रवाहात वाहून गेली होती. त्यानंतर निफाड तालुक्यातील रोहित कैलास कटारे याचा देखील गोदावरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. औरंगाबाद रोडवरील शिलापूर येथे घराजवळ खेळत असताना नाल्याच्या पाण्यात तोल जाऊन बारा वर्षीय कृष्ण दीपक गांगुर्डे या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. सुरगाणा तालुक्यात पुलावरून मोटर सायकलवर जात असताना दोन जण वाहून गेले. त्याआधी पेठ तालुक्यात पळशी येथील नाल्याच्या पुरात एक तर त्रंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथे देखील एकजण नदीत वाहून गेल्याची घटना समोर आली होती.

जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला असताना दरड कोसळण्याच्या, पुराच्या पाण्यात नागरिक वाहून जाण्याच्या, पूल पाण्याखाली गेल्यामुळे गावांशी संपर्क तुटण्याच्या घटना घडल्या आहे. अशात जिल्ह्याला अतिवृष्टीचे संकेतही देण्यात आले आहे. त्यामुळे वारंवार नदीकाठावरील सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी घरातच रहावे, पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी करू नये अशा सूचना केल्या जात आहेत.