‘आधी फ्रेंड रिक्वेस्ट, मग..’ विनयभंगाची धक्कादायक घटना समोर

नाशिक : समाज माध्यमं जेवढे फायद्याचे तेवढेच ते धोकादायक देखील आहेत. याची प्रचिती आणणाऱ्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहे. त्यातल्या त्यात मुलींसाठी समाज माध्यम किती धोकादायक ठरू शकतात याचीही अनेक उदाहरणं आहेत. असंच एक उदाहरण आता नाशिक मधून समोर येत आहे. नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यांतर्गत समाज माध्यमांचा वापर करून एका मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे.

नाशिक मधून समोर येते असलेली ही घटना अत्यंत खळबळजनक आहे. पिडीत मुलीच्या वडिलांनी या संदर्भात तक्रार दिली असून पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, तक्रारदार यांची पिडीत मुलगी तिच्या मोबाईलवर स्नॅपचॅट या समाज माध्यमाचा वापर करत होती. तिने स्नॅपचॅट चे अकाउंट ओपन केलेले होते. त्यावर ती स्वतःचे फोटो काढून टाकायची, तर कधी मित्र मैत्रिणींशी चॅटिंग देखील करायची. दरम्यान एकदा पीडित मुलीला एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून मेसेज आला. तिने देखील कोणीतरी ओळखीचं किंवा शाळेतील मित्र मैत्रीण असावी म्हणून पाठवलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आणि ती सदर इसमासोबत चॅटिंग करू लागली. त्यानंतर एकदा या अनोळखी इसमाने पीडित मुलीस धमकी देत नग्न व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. संतापजनक म्हणजे या संशयित आरोपीने व्हिडिओ instagram च्या अकाउंट वर व्हायरल देखील केले.

या प्रकरणी मुलीच्या अज्ञातपणाचा फायदा घेऊन तिचा विनयभंग केला असून व्हिडिओ स्नॅपचॅट वर आणि इंस्टाग्राम अकाउंट वर व्हायरल केल्याच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी याची कुठलीही माहिती नसून सध्या त्याचा फक्त मोबाईल नंबर पोलिसांच्या हाती आहे. त्यानुसार पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव यांनी याप्रकरणी चौकशी केली असून संशयित इसमाचा शोध सुरू करण्यात आला आहे. मात्र या घटनेने समाज माध्यम हाताळताना काळजी घेणं गरजेचं असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

खरंतर समाज माध्यमं जेवढे जीवन उपयोगी बनत चालले आहे. तेवढेच त्यात गुन्हेगारीचे देखील प्रमाण वाढत चालले आहे. ऑनलाईन डेटिंग, ऑनलाइन प्रेम, ऑनलाइन मित्र-मैत्रिणी यापासून धोका देखील निर्माण होत आहे. असे एक ना अनेक प्रकार या आधी देखील समोर आले आहे. मात्र आपण समाज माध्यमांचा करत असलेला वापर आपलं आयुष्य बिघडवण्यासाठी जबाबदार ठरू शकतो, हे या निमित्ताने लक्षात घेणे खूप गरजेचे आहे.