मैत्रीसाठी वाट्टेल ते! भावी डॉक्टर बनले चोर

नाशिक । प्रतिनिधी

लोक मैत्रीसाठी काय करतील ते सांगता येत नाही. असाच एक प्रकार पुण्यात पाहायला मिळाला आहे. वैद्यकीय शिक्षण काही मित्रांनी आपल्या मैत्रिणीला भेट देण्यासाठी चक्क ज्वेलर्सच्या दुकानात चोरी केल्याचे उघड झाले आहे. अनिकेत हनुमंत रोकडे (२२), वैभव संजय जगताप (२२ ) अशी या तरूणांची नावे आहेत. या दोघां तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित अनिकेत रोकडे हा बी.ए.एम.एस व वैभव संजय जगताप बी. एस. सी नर्सिंगचे तृतीय वर्षात शिक्षण घेत आहेत. येथीलच कॉलेजात त्यांची मैत्रीण देखील शिकते. या मैत्रिणीला गिफ्ट म्हणून या दोन तरुणांनी थेट ज्वेलर्सच्या दुकानातून चोरी करण्याचे ठरविले.

झाले असे कि हे काही दिवसांपूर्वी हे दोघे तरुण नामांकित दुकानात जाऊन कामगाराची नजर चुकवून तीन अंगठ्या घेवून पसार झाले होते. यावेळी हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाला होता. मात्र तोंडाला मास्क लावल्यामुळे आरोपीची ओळख पटत नव्हती.

दरम्यान पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर पोलिसांच्या हाती पुरावे लागले. तातडीने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत कॉलेज गाठले. यावेळी या दोन तरुणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर मैत्रिणीच्या चैनीसाठी या चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपींकडून सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे अडीच लाख रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.