गळ्याला चाकू लावत हिऱ्यांच्या अंगठ्याची चोरी, नाशिकमधील घटना

नाशिक । प्रतिनिधी

कुरिअर आल्याचे सांगत बळजबरीने घरात घुसून वृद्धेच्या गळ्याला चाकू लावत हातातील तीन हिरे जडित अंगठ्या व तीन कोरे चेक लुटून नेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकमधील होलाराम कॉलनी परिसरात हि घटना घडली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नाशिकमध्ये सात्यत्याने घरफोड्या होण्याचे प्रकार समोर येत आहेत. सीसीटीव्ही असूनही सर्रास दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. होलाराम कॉलनीतील संचेती पार्क अव्ह्येनु मध्ये गळ्याला चाकू लावून लूटमार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये घरकाम करणाऱ्या महिलेने घरातील सीसीटीव्ही कॅमेरा बंद करून संशयितास घरात येण्यास मदत केली असून हा पूर्वनियोजित प्लॅन असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अधिक माहिती अशी कि, फिर्यादी पद्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास नेहमीप्रमाणे घरकाम करणाऱ्या महिलेस साफसफाई करण्यास सांगितले. काही वेळात दाराची बेल वाजली. एक जॅकेट घातलेला तरुण कुरिअर असल्याचे सांगून घरात आला. यावेळी ओटीपी आल्याचा बहाणा करून त्याने मोबाईल घेतला. मात्र काही वेळातच या संशयिताने वृद्धेच्या गळ्याला चाकू लावत हातातील अंगठ्या काढून घेतल्या. त्यानंतर संशयिताने पैशाची विचारणा केली. मात्र घरात पैसे नसल्याचे पद्मा यांनी सांगितले. अशातच संशयिताने चेक देण्यास सांगून जावयाला मारण्याची धमकी दिली. चेक घेत सदर संशयित फरार झाला.

घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे दाखल झाले. यावेळी सोनवणे यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले. मात्र यातून काहीही हाती लागले नाही. तसेच श्वान पथकाने देखील तपासणी केली परंतु श्वान लिफ्ट पर्यतच मागोवा घेऊ शकले. या प्रकरणी घरकाम करणाऱ्या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस करीत आहेत.