आता नाशिकमधील झाडांना लागणार ‘क्यू आर कोड’

नाशिक । प्रतिनिधी

आदिश्री पगार या चिमुकलीने वृक्ष वाचवा या मोहिमेत सहभाग घेतला असून तिने वेगळ्या पद्धतीने वृक्ष वाचविण्यास सुरवात केली आहे. आदिश्रीने तब्बल दीडशे झाडांचे क्यू आर कोड तयार केले असून त्या माध्यमातून त्या झाडांची इंत्यभूत माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

दोन दिवसांपूर्वी उंटवाडी येथील वटवृक्षांवर मनपाकडून घाला घालण्यात येणार होता. या पार्श्वभूमीवर नाशिकरांनी एकत्र येत याबाबत आवाज उठविला. आणि अखेर या आंदोलनाची दखल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली. आता नाशिकमधील इतर वृक्षांना वाचविण्यासाठी आदिश्रीने सहभाग घेतला असून तिने यासाठी क्यू आर कोडची मदत घेतली आहे.

आपल्या सभोवताली असणार्‍या झाडांची माहिती प्रत्येकाला मिळावी, यासाठी आदिश्रीने खास क्यूआर कोड तयार केले आहेत. तिने हे क्यूआर कोड आजूबाजूच्या झाडांवर लावले आहेत. हे कोड मोबाइलवरील क्यूआर कोड स्कॅनरने स्कॅन करताच, त्या झाडाची संपूर्ण माहिती मोबाइलच्या स्क्रीनवर उमटते. त्यात झाडाचे मराठी, इंग्रजीसह अन्य भाषेतील नाव, शास्त्रीय नाव, झाडाचे कार्य, उपयुक्तता, मूळ स्थान, ते जगभरात कोठे कोठे आढळून येते, अशा सर्व माहितीचा समावेश आहे. आदिश्रीने उंटवाडीतल्या वटवृक्षाचा तयार केलेला क्यू आर कोड झाडावर लावला असून यापुढे नाशिकमधील वृक्षांना क्यू आर कोडद्वारे जपण्यास तिने सुरवात केली आहे.

दरम्यान मनपाच्या उद्यान विभागाने हरकती मागविणाऱ्या नोटीस लावल्यानंतर शनिवारपासून सोशल मीडियावर मनपा प्रशासनाविरुद्ध संतापाची लाट उसळली. राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील लक्ष घालत मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्याशी फोनवर संपर्क साधला. उड्डाणपुलाचा आराखडा बदलण्याचे आदेश दिले. मात्र मनपाने यासाठी दहा दिवसांचा कालावधी मागितला असून त्यानंतर अहवाल सादर करण्यात येणार आहे.

क्यूआर कोडमुळे झाडांची माहिती मिळेल, त्यामुळे त्यांच्याशी आपली ओळख होईल आणि आपण त्यांची काळजी घ्यायला शिकू. झाडेही आपल्याशी बोलतील. प्रत्येकाने झाडे लावायलाच हवी.
– आदिश्री पगार, विद्यार्थिनी नाशिक